दरवर्षीप्रमाणे पावसाळ्याच्या चार महिन्यांतील सागराला मोठी भरती येणाऱ्या दिवसांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीनुसार १९ दिवस मोठय़ा भरतीचे असून त्या दिवशी साडेचार मीटरने समुद्राच्या पाण्याची पातळी उंचावणार आहे. साहजिकच त्या दिवशी लाटांचा वेग आणि उंचीही जास्त असेल. अशा दिवशी जास्त पाऊस झाल्यास मुंबई तुंबते. त्यामुळे पालिकेने याबाबत आतापासूनच उपाययोजना करायला हव्या. पण त्याचबरोबर अशा भरतीच्या दिवशी समुद्रकिनाऱ्यांवर वाढणारा पर्यटकांचा ओघदेखील कमी करायला हवा. उसळणाऱ्या लाटांच्या पाश्र्वभूमीवर ‘सेल्फी’ काढण्याच्या प्रयत्नात एखाद्याचा तोल गेल्यास ते जिवावर बेतू शकते. गेल्या वर्षी अशा काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे भरतीच्या दिवशी अशा पद्धतीने ‘सेल्फी’ काढण्याचा मोह टाळायला हवा.

– दीपक काशीराम गुंडय़े, वरळी.

नागरिकांनीही खबरदारी घ्यावी

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे आणि उपनगरांमधून घरफोडीच्या प्रमाणात बरीच वाढ झालेली आढळून येते. तशी ती या मोसमात नेहमीच असते. साधारणपणे संकुलातील सुरक्षारक्षक, कामवाल्या बाया, गाडी धुणारे आणि दूध, पेपर टाकणाऱ्यांवर संशयाची सुई प्रथम जाते. या मंडळींची नेमणूक करताना पुरेशी काळजी घेतली जात नाही, अशीही नाराजी मागाहून व्यक्त केली जाते. या समस्येला बरेच पैलू आहेत. या सर्व घरांतून चोरटय़ांनी लाखो रुपयांची रोकड, कित्येक तोळ्यांचे दागिने लंपास केले, अशा बातम्या प्रसिद्ध होतात. पण यानिमित्ताने एक प्रश्न पडतो तो हा की, सध्याच्या ‘एटीएम’मधून कधीही पैसे मिळण्याची संधी असणाऱ्या दिवसांत घरात इतकी रोकड ठेवण्याची गरजच काय?

शिवाय दागिनेही बँकांच्या लॉकरमध्ये ठेवता येतात. अशा वेळी एवढी रक्कम किंवा दागिने घरात ठेवून जाताना नागरिकांनीही खबरदारी घ्यायला हवी.

– किशोर गायकवाड, कळवा, ठाणे