संदीप आचार्य

मुंबई: समोर एकापाठोपाठ थक्क करणारे जादूचे प्रयोग सुरु होते. आपल्या जादूच्या पोतडीतून जादुगार एकेक चिजा बाहेर काढत होता तसे पाहाणारे मंत्रमुग्ध होत होते. शेवटी जादुगाराने समोर असलेल्या एका वयस्कर डॉक्टरला बोलावून तो नेमक्या कोणत्या वर्षी डॉक्टर बनले तर सांगितलेच शिवाय किती वाजता पदवी प्रमाणपत्र घेतले त्याची नेमकी वेळही सांगितली… तेव्हा आश्चर्याने थक्क झालेल्या डॉक्टर व परिचारिकांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.

गेले महिनाभर करोना रुग्णांची सेवा करून आम्ही अक्षरश: मानसिकदृष्ट्या पार थकून गेलो होतो. करोना हा शब्द सोडून दुसरं काही ऐकायलाच मिळत नव्हते. तुमच्या जादुने थोड्यावेळासाठी आम्ही सारे पार विसरुन गेलो. आमचा मानसिक थकवा पळून गेला हे उद्गार आहेत जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमधील ज्येष्ठ परिचारिका स्मिता देशपांडे यांचे. अशीच भावना उपस्थित असलेल्या अन्य डॉक्टर व परिचारिकांनी व्यक्त केली.

मागचा महिनाभर महापालिका रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, आया तसेच अन्य कर्मचारी कसलीही पर्वा न करता करोनाशी लढत आहेत. या सर्वांचे मानसिक स्वास्थ्य टिकवणे हे आव्हान बनत चालले आहे. करोनाच्या या लढाईत आरोग्य सैनिकांच मनोबल टिकवणे व वाढवण्यासाठी काय करता येईल याचा आढावा घेऊन उपाययोजना तयार करण्याचे काम वरिष्ठ पातळीवरील डॉक्टर व तज्ज्ञांकडून सुरु आहे. कधी करोना संरक्षित पोशाख व मास्क नाही तर कधी कामाचा ताण, कधी अन्य सहकारी रजेवर गेल्यामुळे करावे लागणारे जाणारे काम आणि करोनाचा बागुलबुवा निर्माण करणाऱ्या माध्यमातील बातम्या यांनी डॉक्टर व परिचारिका दिवसेंदिवस तणावाखाली वावरत आहेत.

पाहा व्हिडीओ

डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे याची जाणीवही प्रशासनातील उच्चपदस्थांना आहे. मार्गही शोधण्याचे काम सुरु होते. अशावेळी एका जादुगाराने थेट मुंबई महापालिका मुख्यालयात जाऊन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची भेट घेऊन जादूच्या प्रयोगाच्या मदतीने डॉक्टर व परिचारिकांनी केवळ तणावमुक्तच नव्हे तर नव्या जिद्दीने व आत्मविश्वासाने लढाईसाठी तयार करतो असा प्रस्ताव समोर ठेवला. खरंतर सुरेश काकाणी खूप कामात होते तरीही त्यांनी या जादुगाराचे म्हणणे एकले. काम करत असतानाच जादुगाराने दाखवलेल्या एकदोन जादु पाहिल्या आणि तात्काळ आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्यांना जादुगाराचा अर्ध्या तासासाठी प्रयोगाची व्यवस्था करण्यास सांगितले.

आपल्याला या कामासाठी एक रुपयाही मानधन नको. केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून हा प्रस्ताव असल्याचे सुरुवातीला जादुगाराने स्पष्ट केले. त्यानुसार आज सकाळी अकराच्या सुमारास जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमधील १३ व्या मजल्यावरील ऑडिटोरियममध्ये प्रसिद्ध जादुगार व मेंटॅलिस्ट भुपेश दवे यांनी उपस्थित डॉक्टर व परिचारिकांसमोर अनेक जादूचे प्रयोग केले. काही परिचारिकांच्या हातात छोटे रंगीत  चेंडू देऊन त्याचा रंग ओळखून दाखवला तर एका डॉक्टरला पुस्तक देऊन कोणत्याही पानावरील एक शब्द लक्षात ठेवायला सांगून नेमका तो शब्द ओळखून दाखवला.

जादुच्या प्रयोगांसाठी अर्धा तास वेळ निश्चित झाला होता पण प्रत्यक्षात भुपेश दवे यांचा कार्यक्रम जवळपास दीड तास चालला. कार्यक्रम संपल्यावर उपस्थित डॉक्टर व परिचारिकांनी पुन्हा एकदा कार्यक्रम करण्याची गळ तर घातलीच शिवाय या मागणीसाठी काहींनी आपले व्हिडिओ काढून ते रुग्णालय प्रमुखांना पाठवले. करोनाच्या या लढाईत आपणही काही तरी केले पाहिजे असे सतत वाटत होते. हिम्मत करून अतिरिक्त आयुक्त काकाणी सरांकडे गेलो. आज माझ्या प्रयोगानंतर बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमधील डॉक्टर व परिचारिकांच्या चेहर्यावर जो आनंद दिसला तो मलाही भारावून गेला.

प्रशासनाने परवानगी दिली तर पालिका रुग्णालयात करोनाशी लढणार्या या सैनिकांचा जादूच्या माध्यमातून तणाव हलका करण्याचे काम नक्कीच करीन असे भुपेश दवे यांनी सांगितले. दादरच्या किर्ती महाविद्यालयात शिकत असल्यापासून जादुने झपाटून टाकले होते. अमेरिकेसह अनेक देशात मेंटॅलिस्ट म्हणून आपले प्रयोग होतात. कॉर्पोरेट क्षेत्रातही मोटिव्हेशनल ट्रेनर म्हणून काम करणार्या भुपेश ने यापूर्वीही सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक कार्यक्रम केले आहेत. पुण्यातील पॅराप्लेजिक जवानांसाठीही पुण्यात जाऊन जादुच्या दुनियेतून या जवानांना सैर करून आणले आहे. केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यातील कोणत्याही रुग्णालयात जाऊन करोनाशी लढणार्या आरोग्य सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी जादुच्या दुनियेतून नक्कीच फिरवून आणीन असे भुपेश दवे यांनी सांगितले.