19 August 2018

News Flash

सिद्धिविनायकाच्या महापूजेचा ‘कार्पोरेट’ घाट

बोर्डाच्या परीक्षेतील यशासाठी ‘जाहिरातबाजी’

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

बोर्डाच्या परीक्षेतील यशासाठी ‘जाहिरातबाजी’

परीक्षेचा हंगाम सुरू झाला की देवळांत होणारी गर्दी ही आता ‘कॉर्पोरेट कंपन्यांची गिऱ्हाईके’ बनली आहे. एकीकडे शाळेत वैज्ञानिक दृष्टिकोनाचे धडे मुलांना दिले जात असताना यशाची हमी देणाऱ्या ‘पूजेची दुकानदारी’ही जोमात सुरू आहे. संकेतस्थळांवर परीक्षेतील यशासाठी बोर्डाच्या परीक्षेसाठी सिद्धिविनायक मंदिरात महापूजा करण्यात येणार असून सध्या या पूजेची जाहिरातबाजी सुरू आहे. विद्यार्थ्यांनी घरी बसून अभ्यास करायचा आणि पूजेची तयारी करणाऱ्या कंपन्यांना पैसे देऊन घरी सिद्धिविनायकाचा प्रसाद, उदी, पेन मिळवायचे असे या ‘ऑफर’चे स्वरूप आहे.

परीक्षा जवळ आली की देवळांमध्ये गर्दी दिसू लागते. मात्र, आता प्रत्यक्ष देवळात जाण्याऐवजी घरबसल्या हव्या त्या देवाची पूजा करून प्रसाद घरी पाठवण्याची दुकानदारी मोठय़ा प्रमाणात सुरू झाली आहे. परीक्षेच्या आधी देवळात जमणारी ही गर्दी या आशीर्वाद विक्रेत्यांची गिऱ्हाईके झाली आहेत. मुलांना यश मिळवून देण्यासाठी पूजेची दुकाने मोठय़ा प्रमाणावर सुरू झाली आहेत. ही दुकानं चालवणाऱ्या संकेतस्थळांनी सध्या बोर्डाची परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. सिद्धिविनायक मंदिरात या परीक्षार्थीसाठी महापूजा करण्यात येणार आहे. मुलांनी घरी बसून पूजेसाठी ऑनलाइन नोंदणी करायची आणि परीक्षेला जाताना लावण्यासाठी मुलांना अंगारा, प्रसाद, परीक्षेसाठीचे पेन, विद्यार्थ्यांच्या नावाने दक्षिणेची पावती आणि गणपतीचा फोटो अशी सामाग्री घरपोच देण्याची ही योजना आहे.

शेकडो रुपयांचा यशाचा मार्ग

शेकडो रुपयांचे मूल्य उकळून हा यशाचा मार्ग कंपन्यांकडून दाखवण्यात येत आहे. परीक्षेत जास्त गुण मिळावे, मन शांत राहावे, अभ्यास चांगला व्हावा, इच्छाशक्ती वाढावी, कुटुंबाकडून मिळणारे पाठबळ वाढावे असे फायदे या पूजेतून मिळत असल्याची जाहिरातबाजीही या कंपन्यांकडून करण्यात येत आहे.

 

First Published on February 10, 2018 1:27 am

Web Title: mahapuja in siddhivinayak temple