वैभव राऊतची मोटार हस्तगत, साताऱ्यातही छापे

मुंबई : संशयित हिंदुत्ववादी अतिरेकी वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर याच्या घराची बुधवारी राज्य दहशतवादविरोधी पथकाने(एटीएस) पुन्हा झडती घेतली. नालासोपारा येथील कारवाईच्या वेळी एटीएसने अटकेतील राऊतलाही सोबत घेतले होते. सुमारे तासभर बंद खोलीत कुटुंबीयांसमोर चौकशी केल्यानंतर एटीएसने राऊतची इनोव्हा मोटारही ताब्यात घेतली.

छाप्याच्या वृत्ताला एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेही दुजोरा दिला. या कारवाईतून नेमके काय हाती लागले, याबाबतची माहिती देण्यास मात्र या अधिकाऱ्याने नकार दिला.

गेल्या आठवडय़ात शुक्रवारी राऊत, गोंधळेकर यांच्यासह शरद कळसकरलाही एटीएसने अटक केली. त्यानंतर या टोळीने नालासोपारा आणि (पान १० वर) (पान १ वरून) पुण्यात दडवलेली स्फोटके, गावठी बॉम्ब, बॉम्ब बनवण्याचे साहित्य, रसायने, शस्त्रे, त्यांचे सुटे भाग, जिवंत काडतुसे इत्यादी साहित्य हस्तगत केले.

सहा दिवसांच्या चौकशीनंतर एटीएसने राऊतला प्रथमच कोठडीबाहेर काढून शोधमोहिमेसाठी सोबत घेतले. दुपारी तीनच्या सुमारास नालासोपारा येथील भंडार आळीतील राऊतच्या घरी एटीएस पथक धडकले. राऊतला घरी आणल्याची माहिती मिळताच परिसरातील रहिवासी आणि त्याच्या मित्रांनी घराबाहेर गर्दी केली. बुरखा घालून आणलेली व्यक्ती वैभवच आहे का, बुरखा काढा, आम्हाला खात्री करू द्या, आम्हाला त्याच्याशी बोलू द्या, असा आरडाओरडा जमावातील काहीजण करीत होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून स्थानिक पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. राज्य राखीव दलाचे जवानही सोबत होते.

एटीएसच्या पथकाने दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई पूर्ण केली. इमारतीच्या मागच्या भागात उभी केलेली इनोव्हा गाडी ताब्यात घेऊन एटीएसचे पथक मुंबईला आले. राऊत किंवा अन्य दोन आरोपींच्या चौकशीतून पुढे आलेल्या माहितीच्या आधारे राऊतची गाडी ताब्यात घेण्यात आली. स्फोटके आणि शस्त्रसाठय़ाची ने-आण करण्यासाठी याच गाडीचा वापर करण्यात आला असावा, असा एटीएसला संशय आहे.

साताऱ्यात छापे

वाई : साताऱ्यातील संशयित हिंदुत्ववादी अतिरेकी सुधन्वा गोंधळेकर याच्या घरावर मंगळवारी रात्री उशिरा दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे शाखेच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्याच्या करंजे- झेंडा चौकातील घराची एटीएसच्या अधिकाऱ्यांनी झडती घेऊन कुटुंबीयांचीही चौकशी केली.

हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित वैभव राऊत याच्या नालासोपारा येथील घरावर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. त्याच्याकडे गावठी बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य सापडले होते. वैभवच्या प्राथमिक चौकशीतूनच सुधन्वाचे नाव उघड झाले होते. त्याला शुक्रवारीच अटक होऊन त्याच्याकडूनही शस्त्रे हस्तगत करण्यात आली.

मी निर्दोष आहे..

एटीएसच्या कारवाईला सहकार्य करा, मी निर्दोष आहे. या प्रकरणातून सुटून लवकर घरी येईन, असे राऊतने आपल्या कुटुंबीयांना सांगितल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. आपल्या पतीला पोलिसांनी कशासाठी घरी आणले होते, ते  समजले नाही. पोलिसांनी गाडीची कागदपत्रे नेली. पतीशी धड बोलूही दिले नाही, अशी प्रतिक्रिया राऊतच्या पत्नी लक्ष्मी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि अन्य जिल्ह्यंमधील एटीएसची पथके तिन्ही संशयित आरोपींच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची चौकशी करीत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासह चौघांच्या हत्या आणि दहशतवादी कारवायांच्या अनुषंगाने आरोपींची चौकशी करण्यात येत आहे.