विधानसभा निवडणुकीत स्वतः पराभूत झालेले कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता भाजप सरकारमध्ये नसल्याची टीका मंगळवारी मुंबईत केली. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी शिवसेनेवरही हल्लाबोल केला. सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना इतकी लाचार होऊ शकते, असे मला कधी वाटले नव्हते, असे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करून ते म्हणाले, मुख्यमंत्रीपद सांभाळण्यासाठी जे चातुर्य लागते, अनुभव लागतो, तो फडणवीस यांच्याकडे नाही. एकनाथ खडसे सोडले, तर चांगले सहकारी आणि प्रभावी मंत्रीही मंत्रिमंडळात दिसत नाही. मंत्रिमंडळ कमजोर असल्यामुळे ते जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकतील असे वाटत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजप सरकारला दिलेला पाठिंबा स्वसंरक्षणासाठी आहे की स्थिर सरकारसाठी हे अजून स्पष्ट झालेले नाही, असे त्यांनी सांगितले. अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सांभाळताना देवेंद्र फडणवीस यांनी वेगळ्या विदर्भावर भाष्य करू नये, असेही ते म्हणाले.
सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना इतकी लाचार होईल, असे मला कधी वाटले नाही, असा टोला लगावून ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी सत्तेवर लाथ मारली असती आणि विरोधात बसले असते. शिवसेनेत आलेल्या काही नेत्यांना सत्तेचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळेच शिवसेना सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करते आहे, असा आरोप त्यांनी केला. अनुभवी नेतृत्त्व आणि उत्तम प्रशासक शिवसेनेकडेही नसल्याचे त्यांनी सांगितले.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी तुटली, त्यावेळीच सत्ता जाणार हे स्पष्ट झाले होते. काही नेत्यांनी सत्तेत असतानाच निवडणुकीनंतर सत्ता जाणार हे भाकीत केले होते, असेही त्यांनी सांगितले. यापुढे आपण विधानसभेची निवडणूक लढविणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.