मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घाटकोपरमध्ये झालेल्या विमान अपघातस्थळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास दाखल झाले असून घटनेची पाहणी करीत आहेत. ही दुर्घटना अत्यंत दुर्देवी असल्याचे त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. तसेच केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्र्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अपघातातील मृतांना योग्य तो मोबदला दिला जाईल असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


फडणवीस म्हणाले, विमान अपघाताची घटना बांधकाम सुरु असलेल्या मोकळ्या जागेत घडल्याने सुदैवाने यात मालमत्तेचे मोठे नुकसान आणि जीवितहानी झाली नाही. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांशी मी स्वतः संपर्क साधला असून नागरी भागात विमान कोसळणे ही मोठी घटना असल्याने यामागचे कारण, चूक सर्वांसमोर यायला हवी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दरम्यान, डीजीसीएची टीम घटनास्थळी पोहोचली असून अपघाताची चौकशी सुरु करण्यात आली आहे. या चौकशीनंतरच संपूर्ण माहिती कळू शकेल. तसेच अपघातातील मृतांना योग्य मोबदला दिला जाईल असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

घटकोपरच्या जागृतीनगर जॉगर्स पार्कजवळील एका इमारतीच्या बांधकाम सुरु असलेल्या मोकळ्या जागात एका चार्टर्ड विमानाचे क्रॅश लॅडिंग झाले. यामध्ये महिला पायलटसह विमानातील तीन सहकारी आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.