वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाची सर्व तयारी झाली असून आता फक्त रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षा प्रमाणपत्र येणे बाकी आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात ‘मेट्रोवन’चे उद्घाटन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सहार उन्नत मार्गाच्या उद्घाटन समारंभात जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे समोर आले आहे. मेट्रोवन प्रकल्पासाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळवण्यासाठीचा प्रस्ताव मेट्रो प्राधिकरणाने रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे पाठवणे गरजेचे आहे. मात्र हा प्रस्ताव अद्याप रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे पोहोचलाच नसल्याचे समजते.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर हा बहुचर्चित मेट्रोमार्ग तयार होऊन अनेक महिने झाले आहेत. या मार्गावरील सर्व स्थानके अद्याप तयार झाली नसल्याचे मध्यंतरी जाहीर करण्यात आले. तसेच रिसर्च, डिझाइन्स अॅण्ड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (आरडीएसओ)ने मेट्रोच्या चाचण्या घेतल्याचेही प्राधिकरणाने सांगितले होते. दरम्यान, १२ फेब्रुवारी रोजी सहार उन्नत मार्गाच्या उद्घाटन समारंभात भाषण करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेट्रोची पूर्ण तयारी झाली असल्याचे जाहीर केले. मेट्रोची तयारी आमच्याकडून झाली असून आता फक्त रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून येणाऱ्या सुरक्षा प्रमाणपत्राची प्रतीक्षा आहे. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. हे प्रमाणपत्र महिन्याभरात मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात मेट्रोवनचेही उद्घाटन करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.
सुरक्षा प्रमाणपत्रासाठी आरडीएसओतर्फे मेट्रोच्या चाचण्या करण्यात येतात. त्या चाचण्यांचा अहवाल आरडीएसओ मेट्रो प्राधिकरणाकडे सादर करते. हा अहवाल पुढे सुरक्षा आयुक्तांकडे येतो. या अहवालातील सर्व तपशीलांची तपासणी सुरक्षा आयुक्त करतात. मेट्रोचे डबे आणि मेट्रो मार्ग, त्या मार्गावरील स्थानके, खांब, गर्डर या सर्वाची तपासणी केली जाते. या सर्व गोष्टी नियमावलीप्रमाणे असतील, तरच सुरक्षा आयुक्त सुरक्षा प्रमाणपत्र देतात.
मात्र याबाबत पश्चिम विभागाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त पी. एस. बघेल यांना विचारले असता मेट्रोवनच्या सुरक्षा प्रमाणपत्रासाठीचा प्रस्ताव आपल्याकडे आला नसल्याचे त्यांनी सांगितले. आरडीएसओच्या सर्व चाचण्या झाल्याचे आपल्याला कळले आहे. मात्र या चाचण्यांचा कोणताही अहवाल प्रस्तावासह आपल्याकडे आलेला नाही. हा अहवाल आल्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्यासाठी एक दिवस ते काही महिने असा कितीही कालावधी लागू शकतो, असेही बघेल यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी महिनाभरात या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची घोषणा केली असली, तरी दफ्तर दिरंगाईचा विचार करता मुख्यमंत्र्यांची ही घोषणा प्रत्यक्षात उतरणे कठीण आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेट्रोवनला आचारसंहितेच्या काळातच सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे.