उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या मोठय़ा राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष संघटनात्मकदृष्टय़ा कमकुवत असल्याने आगामी निवडणुकांमध्ये लोकसभेच्या दुसऱ्या क्रमांकाच्या जागा असलेल्या महाराष्ट्राकडून काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अपेक्षा आहेत. या दृष्टीनेच राज्यात पक्ष वाढीसाठी नव्याने प्रयत्न करण्यात येणार आहेत. जुन्या आणि नव्या नेत्यांचा मेळ घालून पक्ष अधिक आक्रमक करण्याचे मोठे आव्हान नेतृत्वासमोर असेल.

उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक ४८ जागा महाराष्ट्रात आहेत. भाजपने महाराष्ट्रावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेसच्याही अपेक्षा राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याच्या आहेत. खासदारांची जास्त संख्या असलेल्या राज्यांमध्ये काँग्रेस सर्वत्र संघटनात्मकदृष्टय़ा बळकट नाही. या तुलनेत महाराष्ट्रात काँग्रेसला चांगले यश मिळू शकते, असा नेतेमंडळींना विश्वास आहे. महाराष्ट्र राज्याने पारंपारिकदृष्टय़ा काँग्रेसला साथ दिली आहे. भविष्यातही हाच कल कायम राहिल, असे राज्याचे पक्षाचे प्रभारी व अ. भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस मोहन प्रकाश यांचे म्हणणे आहे.

राज्यात गेल्या तीन वर्षांत झालेल्या विविध निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेस अशीच लढत झाली आहे. काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाचे यश मिळाले आहे. या पाश्र्वभूमीवर काँग्रेस नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. राज्यातून खासदारांचे चांगले संख्याबळ मिळू शकते. अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आढावाही घेतला होता.

राज्यात राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याचा निर्णय पक्षाला घ्यावा लागेल. राज्यातील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊनच राज्यातील नेत्यांनी केलेल्या शिफारसीनुसार आघाडीचा निर्णय घेतला जाईल. गेल्या मंगळवारी नागपूरमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीच्या संयुक्त  मोर्चात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दोन्ही काँग्रेस एकत्र आले आणि मतविभाजन टाळल्यास राज्यात नक्कीच परिवर्तन होऊ शकते, अशी ग्वाही दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेस कोणती भूमिका घेतो, जागावाटप हे सारे मुद्दे लक्षात घेऊन मगच आघाडीचा निर्णय घ्यावा लागेल. सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी असताना त्या नेहमीच राष्ट्रवादीला झुकते माप देत असत. राहुल गांधी यांची राष्ट्रवादीबद्दलची भूमिका लपून राहिलेली नाही.

अपेक्षा वाढल्या – अशोक चव्हाण

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेस पक्षात चैतन्य येईल व पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. पक्षाला चांगले यश मिळवून देण्याचे मोठे आव्हान आगामी काळात आहे. कारण राज्यातून चांगल्या यशाच्या पक्षाला अपेक्षा आहेत. भाजप सरकारच्या कारभाराला विटलेली जनता काँग्रेसवर विश्वास व्यक्त करेल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.