राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

राज्यात यापुढे सर्व शिक्षण संस्था, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला योग दिन साजरा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याचबरोबर योगविद्येचा प्रचार व विकास करण्यासाठी दर वर्षी १२ ते २६ जानेवारी यादरम्यान पाच दिवस योग उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षांपासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्राने घेतला आहे. त्यानुसार गेल्या वर्षी भारतात हा दिवस योगदिन म्हणून साजरा करण्यात आला.

आता केवळ वर्षांतून एक दिवस योग दिन साजरा करणे पुरेसे ठरणार नाही, तर विद्यार्थी व नागरिकांमध्ये योगविद्येबाबत जागृती घडवून आणण्यासाठी सातत्याने कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहे, असे केंद्र सरकारने ठरविले आहे. त्यानुसार राज्यांनी नियोजन करावे, असे केंद्राने कळविले आहे.

केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर २१ जून हा योगदिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याची आता आणखी व्याप्ती वाढविण्याचे ठरविले आहे.

त्यानुसार राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण संस्था व विद्यापीठांमध्ये प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर दर वर्षांला १२ व २६ जानेवारी या दरम्यान पाच दिवस योग उत्सव साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून योग विद्येबाबत जनजागृती घडवून आणण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे सांगण्यात आले आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय व शिक्षण अधिकारी (माध्यमिक) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हासस्तरीय, अशा दोन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.