हिवाळी अधिवेशनाचा दिवस अपेक्षेप्रमाणे वादळी ठरत आहे. विधानसभेचे कामकाज सुरु होताच विरोधकांनी मराठा आरक्षण अहवाल सभागृहात मांडण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. यामुळे सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात मांडा आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत आग्रही आणि आक्रमक भूमिका विरोधकांनी मांडली.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी नंतर विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडत सरकारविरोधी घोषणा देण्यास सुरुवात केली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, भाई जगताप, भारत भालके आदींसह विरोधी पक्षाचे आमदार उपस्थित आहेत.