महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री बहुजन समाजाचा होईल असा विश्वास भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात बहुजन समाज आणि अनुसूचित जातीतील समुदायाची इतकी मोठी संख्या असतानाही आम्ही सत्तेपासून दूर का राहिलो? हे जवळून पाहण्यासाठी महाराष्ट्रात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र ही आमच्यासाठी पूजनीय भूमी आहे कारण ती बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. भीमा कोरेगाव हे आमच्यासाठी तीर्थस्थळ आहे. तिथल्या मातीला नमन करण्यासाठी आलो आहे असेही आझाद यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात आम्ही शासक बनू, मालक बनू यासाठी समाजाची ताकद मजबूत करणार असल्याचंही चंद्रशेखर आझाद यांनी स्पष्ट केलं.  दरम्यान आझाद पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या राज्यात विविध ठिकाणी पाच सभा होणार आहेत. त्यातील पहिली सभा २९ डिसेंबर रोजी वरळीच्या जांबोरी मैदानात संध्याकाळी ४ वाजता होणार आहे. त्यानंतर ३० डिसेंबरला पुण्यात सभा, ३१ डिसेंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्याख्यान, १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, २ जानेवारीला लातूर येथे सभा त्यानंतर ४ जानेवारीला अमरावती येथे जाहीर सभा होणार आहे.

महाराष्ट्रात बहुजन समाजाची मोठी ताकद आहे, तरीही इतरांसारखे हमे सत्ता दो हमे सत्ता दो असे मागत फिरतात. महाराष्ट्राच्या पुढच्या विधानसभा निवडणुकांनतर बहुजन समाजाचा मुख्यमंत्री होईल आणि समाजाच्या हिताचे काम करेल असेही यावेळी आझाद यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.