मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी जाहीर केली. पहिल्या यादीत ६८ गावांमधील १५ हजार ३५८ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा करून मार्च-एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना लाभ मिळेल, असे जाहीर केले होते. पहिली यादी २४ फेब्रुवारीला म्हणजे विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जाहीर करण्यात आली. या योजनेसाठी ३४ लाख ८३ हजार ५०८ शेतक ऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना दिलेली ही पीक कर्जमाफी दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकीत कर्जासाठी आहे. या योजनेसाठी सुरुवातीला आकस्मिकता निधीत १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शेतकऱ्याकडून कन्येच्या विवाहाचे आमंत्रण

‘साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही.. तुम्हीही लग्नाला या..’ असं आपुलकीचं आमंत्रण परभणी जिल्ह्य़ातील विठ्ठलराव गरुड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं.. तर पहिल्यांदाच कर्जमुक्तीसाठी हेलपाटे मारावे लागले नाही, अशी भावना अहमदनगर जिल्ह्य़ातल्या पोपट मुकटे या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांजवळ व्यक्त केली.