15 October 2019

News Flash

मोबाइल नेटवर्कसाठी माहुलवासीयांची रस्त्यावर बसकण!

एमएमआरडीएने माहुल गाव परिसरात १२ ते १५ वर्षांपूर्वी ४६ इमारती बांधल्या.

घरात नेटवर्क येत नसल्याने माहुलवासीयांना वसाहतीबाहेरील रस्त्यावर येऊन फोनाफोनी करावी लागते.

घरात अजिबात ‘रेंज’ येत नसल्याने मुख्य रस्त्यावर येरझाऱ्या; मुंबईतल्या वस्तीची ही तऱ्हा

समीर कर्णुक, मुंबई

दूषित हवा, घाणीचे साम्राज्य आणि इमारतींची दुरवस्था अशा अनेक समस्यांनी त्रस्त असलेल्या माहुल प्रकल्पग्रस्तांना सध्या आणखी एक नवीन समस्या भेडसावत आहे. माहुलमध्ये ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ने (एमएमआरडीए) प्रकल्पग्रस्तांकरिता वसविलेल्या या वसाहतीमधील एकाही घरात भ्रमणध्वनीचे नेटवर्क येत नाही. परिणामी कुणाला फोन करायचा असल्यास रहिवाशांना सातत्याने मुख्य रस्त्यावर यावे लागते.

मुंबई शहरातील विविध प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या नागरिकांसाठी एमएमआरडीएने माहुल गाव परिसरात १२ ते १५ वर्षांपूर्वी ४६ इमारती बांधल्या. यामध्ये १२ हजार ७१४ घरे असून त्यामध्ये सध्या आठ हजार कुटुंबे वास्तव्यास आहेत. सध्या या सर्व इमारतींचा ताबा मुंबई महानगरपालिकेकडे आहे. तानसा जलवाहिनीच्या आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांचे पुनर्वसन मुख्यत: या ठिकाणी करण्यात आले आहे. मात्र महापालिकेकडून रहिवाशांच्या समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. परिणामी येथील रहिवाशांना अनेकदा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला आहे. या वसाहतीच्या परिसराला लागूनच विविध तेल आणि गॅस कंपन्या असल्याने येथील रहिवाशांच्या आरोग्यावर याचा मोठा परिणाम होत आहे. त्यातच घाणीचे साम्राज्य, दुर्गंधी, दूषित पाणी आणि इमारतींची दुरवस्था अशा अनेक समस्या येथील नागरिकांना भेडसावत आहेत. त्यामुळेच या ठिकाणी पुनर्वसन झालेल्या सर्वच नागरिकांकडून दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.

या सर्व समस्यांनी येथील रहिवाशी त्रस्त असतानाच सध्या येथील रहिवाशांना मोबाइल नेटवर्कची आणखी एक समस्या भेडसावत आहे. घरात एकही फोन मोबाइलवर येत नाही अथवा कोणाला फोनदेखील करता येत नाही. त्यामुळे कोणाला फोन करायचा असल्यास येथील रहिवाशांना मुख्य रस्त्यावर येऊन फोन करावा लागतो. सध्या उन्हाचे दिवस, त्यातच इमारतींना लिफ्टदेखील नसल्याने अनेक रहिवाशी कामावरून घरी परतल्यानंतरही सायंकाळी व रात्रीच्या वेळेस रस्त्यावर रेंजच्या शोधात येतात. त्यामुळे या वेळी रस्त्यावरील पदपथावर मोबाइलमध्ये मग्न झालेले अनेकजण पाहायला मिळतात.

मी आई, पत्नी आणि दोन मुलांसह राहतो. मी काम करत असलेल्या  कंपनीकडून मला अनेकदा इतर शहरांमध्ये कामाकरिता पाठवले जाते. या वेळी मला कुटुंबाशी संपर्क साधणे शक्य होत नाही. कुटुंबीयांनी घराबाहेर येऊन फोन केला तरच मला त्यांच्याशी बोलता येते.

– निशांत पुजारी, रहिवासी, माहुल

देशाच्या कानाकोपऱ्यात मोबाइलचे नेटवर्क पोहचले आहे. पण आम्ही मुंबईत राहूनही आमच्या इथे एकाही कंपनीचे नेटवर्क येत नाही. त्यामुळे आम्ही घरी वायफाय लावून घेतला असून त्याआधारे व्हॉट्सअ‍ॅप किंवा इंटरनेट वापरून इतरांशी संपर्क साधतो.

– एजाज सय्यद, रहिवासी, माहुल

First Published on May 15, 2019 3:33 am

Web Title: mahul residents not get mobile network at home