चक्क मंदिरावरच हातसफाई करून गुजरात राज्यातल्या अहमदाबाद येथे पोबारा केलेल्या पुजाऱ्याला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सुखदेव प्रभुराम रोहित याला अटक केली असून सद्या तो पोलीस कोठडीत आहे. आरोपी सुखदेव प्रभुराम रोहित हा मुळचा राज्यस्थानचा असून तो मंदिराचा पुजारी म्हणून काम करायचा. सुखदेव हा काम करण्यापुर्वी ज्या मंदिरात जास्त मुर्ती आणि मुर्तीच्या अंगावर जास्त सोन्याचे दागिने आहेत अशा मंदिराची निवड करायचा. मंदिराच्या ट्रस्टचा विश्वास मिळवून काम मिळवायचा. आणि दोन महिन्यात मंदिरात चोरी करून किंमती वस्तू घेऊन पोबारा करायचा.

मागील वर्षी सुखदेव याने मुंबईचं मालाड गाठलं. त्याने एका मंदिरात पुजारी म्हणून काम मिळवले. त्याच मंदिरातून तब्बल अडीच लाखाचे दागिने घेऊन सुखदेव पसार झाला. मालाड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरु झाला. पुजारी बेपत्ता झाल्याने पोलीस सुखदेवचा शोध घेत होते. पण तो पोलिसांना गुंगारा देत होता.

वरिष्ठ निरीक्षक जॉर्ज फर्नांडिस यांच्या पथकातील उपनिरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस नाईक गोरखनाथ पवार, अजय कदम, चंद्रकांत दाभोळकर यांच्या पथकाला तपासादरम्यान एक महत्वपूर्ण माहिती मिळाली. सुखदेव हा अहमदाबाद येथे लपून बसल्याची माहिती मालाड पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांचे पथक अहमदाबादला पोहचले. पोलीस पथकाने अहमदाबाद गुन्हे शाखेच्या पोलिसांची मदत घेतली आणि सुखदेवच्या मुसक्या आवळल्या. सुखदेव हा अहमदाबादला जडेजा या पोलीस अधिकारी नावाने वावरतो. त्याने कोल्हापूर आणि पुणे येथे चोरी केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी तपासा दरम्यान चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे. त्याने अजून कुठे चोरी केल्या आहेत का याचा तपास मालाड पोलीस करत आहेत.