मुंबईसह पुणे, नागपूरच्या महिलांना लाखो रुपयांना गंडा

फेसबुकवर मैत्री करून महिलांना फसवणाऱ्याला गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने सोमवारी अटक केली. भिकन माळी (३२) असे त्याचे नाव असून त्याने मुंबईसह पुणे आणि नागपूरमधील महिलांना लाखो रुपयांना फसवल्याची माहिती तपासातून पुढे येत आहे. फेसबुकवर तरुणीच्या नावे खाते तयार करून, आर्थिक संकट, भरभराट किंवा हाती घेतलेले कार्य तडीस जावे यासाठी कर्मकांड करण्याच्या बहाण्याने त्याने महिलांना फसवले आहे.

बारावी शिकलेल्या माळीने फेसबुकवर बनावट खाती तयार केली. ही सर्व खाती महिलांच्या नावे होती. त्याआधारे तो मुंबई, पुणे किंवा नागपूर शहरातल्या महिलांना मैत्रीचे आवाहन करीत असे. मुंबईतल्या एका तरुणीसोबत त्याची अशीच ओळख झाली. या वेळी त्याने नंदिनी कामत या नावाने तयार केलेल्या बनावट खात्याचा आधार घेतला होता. काही दिवस गप्पा मारल्यानंतर अचानक नंदिनी म्हणजे आरोपी माळीने जर घरात काही अडचण असेल तर सांग, माझा भाऊ पूजा-पाठ, तंत्रमंत्राने अडचण दूर करतो. त्याने अनेकांच्या अडचणी चुटकीसरशी दूर केल्या आहेत, अशी थाप मारली. त्यावर तरुणीने घरात आर्थिक अडचण आहे, असे सांगितले.

ही अडचण दूर करण्यासाठी नंदिनीने आपल्या भावाचा म्हणजे आरोपी माळीने स्वत:चा मोबाइल नंबर तरुणीला दिला. माळीने घरातल्या मौल्यवान वस्तू किंवा दागिने समोर ठेवून सिद्धिविनायकाची पूजा करावी लागेल. त्याने लगेच गुण येईल, मात्र त्यासाठी ६० हजार रुपये खर्च होतील असे सांगितले.

माळीच्या थापांना बळी पडलेली तरुणी ६० हजार रुपयांची रोकड आणि ९० हजार रुपयांचे दागिने घेऊन दादर येथे माळीला भेटली. तरुणीकडील पैसे, दागिने घेऊन पूजा करून येतो, असे सांगून गेलेला माळी पुन्हा परतलाच नाही. त्याचा फोनही बंद येऊ लागला. बऱ्याच वेळाने तरुणीला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने भोईवाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. हा गुन्हा तपासासाठी मानखुर्द पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. दरम्यान, गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षातून या गुन्ह्य़ाचा समांतर तपास सुरू होता. माळीला पश्चिम उपनगरात भेटण्यासाठी बोलावून घेतले. माळी तेथे येताच त्याला अटक करण्यात आली. आतापर्यंत १५ महिलांना फसविल्याची कबुली माळीने चौकशीदरम्यान दिली आहे. प्रत्यक्षात त्याने यापेक्षा जास्त महिलांना गंडा घातला असावा असा संशय पोलिसांना आहे. फसविण्यात आलेल्या महिलांना पोलिसांनी संपर्क साधून तक्रार देण्यास पुढे या, असे आवाहन केले. मात्र अनेक महिलांनी तक्रार देणे टाळले.

१५ महिलांना फसवले

तपास सुरू असताना माळी पश्चिम उपनगरातील एका महिलेला फसविण्याच्या बेतात होता. याचा सुगावा मालमत्ता कक्षाला लागला. कक्षाने या महिलेचा छडा लावला. विश्वासात घेऊन माळीला पश्चिम उपनगरात भेटण्यासाठी बोलावून घेतले. माळी तेथे येताच त्याला अटक करण्यात आली.

आतापर्यंत १५ महिलांना फसविल्याची कबुली माळीने चौकशीदरम्यान दिली आहे. प्रत्यक्षात त्याने यापेक्षा जास्त महिलांना गंडा घातला असावा असा संशय पोलिसांना आहे.

फसविण्यात आलेल्या महिलांना पोलिसांनी संपर्क साधून तक्रार देण्यास पुढे या, असे आवाहन केले. मात्र अनेक महिलांनी तक्रार देणे टाळले. याबाबत विचारता एका अधिकाऱ्याने सांगितले, काही महिलांनी आपल्या कुटुंबाला अंधारात ठेवून माळीला पैसे दिले होते, तर काहींना बदनामी होईल याची भीती वाटते.