लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत आला असला तरी अनेक कामगार, चाकरमानी अजूनही पायपीटच करत असल्याचं चित्र आहे. मुंबईतील अनेक चाकरमानी गेल्या चार-पाच दिवसांपासून सलग चालत आपलं घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. रस्त्यात येणाऱ्या आव्हांनाचा सामना करत आपल्या घराच्या दिशेने जाणाऱ्या एका चाकरमान्याचा पेण येथे दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री मुंबई गोवा महामार्गावर मुंबईहून चालत निघालेल्या एका चाकरमान्याचा वाटेतच मृत्यू झाला आहे. पेण तालुक्यातील जिते गावाजवळ ही घटना घडली आहे. मोतीराम जाधव असे मृत व्यक्तीचे नाव असून. कांदिवली येथून श्रीवर्धन येथील गावी ते कुटुंबासह निघाले होते. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार डिहायड्रेशनमुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

लॉकडाउन दरम्यान चाकरमान्याचा मृत्यू होण्याची रायगड जिल्ह्यातील ही तिसरी घटना आहे. याआधीही कोकणात जाणाऱ्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यापूर्वी ठाणे येथून खेड तालुक्यातील आपल्या गावाकडे चालत जात असलेल्या एका इसमाचा फाळकेवाडी गावाजवळ मृत्यु झाला. तीन ते चार दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचा मृतदेह प्राण्यांनी खाल्लेल्या अवस्थेत होता. तर माणगाव येथे एका महिलेचा चालत जातांना मृत्यू झाला होता