ठाणे, नवी मुंबईला मात्र वगळले

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून ‘सकल मराठा समाजा’ने गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली असून मराठा आंदोलकांकडून मुंबईतही ‘बंद’ पाळण्यात येणार आहे. मुंबईतील ‘मराठा क्रांती महामोर्चा’ या बंदचे नेतृत्व करणार आहे.

नाशिक, ठाणे आणि नवी मुंबई या तीन शहरांत बंद पाळला जाणार नसून सुरक्षेच्या कारणास्तव ठाणे-नवी मुंबईतील शाळा मात्र बंद ठेवल्या जाणार आहेत.

दूध, शाळा-महाविद्यालये आणि वैद्यकीय सेवांना या बंदमधून वगळण्यात आले असून बंद सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत असेल, असे जाहीर करण्यात आले आहे.  २५ जुलै रोजी झालेल्या मराठा क्रांती मोर्चादरम्यान नवी मुंबई  आणि ठाणे शहरात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. त्यामुळे या दोन्ही शहरांत गुरुवारी बंद पाळण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

‘सकल मराठा समाज महाराष्ट्र’तर्फे गुरुवारी पुकारण्यात आलेल्या बंदच्या निर्णयाबद्दल बुधवापर्यंत गोंधळाचे वातावरण होते. २५ जुलै रोजी पार पडलेल्या बंदच्या वेळी शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक वाहतूक सेवा, वैद्यकीय सेवांना वगळण्यात आल्याचे आधी आयोजकांनी जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्ष बंदच्या दिवशी ठाणे आणि नवी मुंबईला बंदाची चांगलीच झळ पोहोचली. अनेक ठिकाणी तोडफोड झाली. सार्वजनिक बसगाडय़ा जाळण्यात आल्या. त्यामुळे ९ ऑगस्टच्या बंदच्या वेळी अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून मराठा कार्यकर्त्यांमध्ये आदल्या दिवशी दुपापर्यंत खलबते सुरू होती.

दरम्यान, या बंदला मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र मुस्लिम एकता परिषद आणि जमियत उलेमा-ए-महाराष्ट्र या संघटनेचे कार्यकर्ते बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

मुंबईत ठिय्या आणि आंदोलन

मुंबईतील  मराठा आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये फूट पडल्याचे चित्र दिसत आहे. काही कार्यकर्त्यांना बंद व्हावा असे वाटत आहे. तर काहींनी ठिय्या आंदोलनाद्वारे रोष व्यक्त करण्याची कल्पना मांडली. त्यानुसार गुरुवारी कार्यकर्त्यांचा एक गट वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सकाळी ११ ते २ या कालावधीत ठिय्या आंदोलन करणार आहे. तर दुसरा गट बंद पुकारणार आहे. याबाबत  मराठा क्रांती महामोर्चाचे मुंबईतील कार्यकर्ते अमोल जाधवराव यांना विचारले असता त्यांनी आंदोलन करण्याचा प्रकार वेगळा असला तरी आमच्या मागण्या सारख्याच आहेत. त्यामुळे संपूर्ण समाजाचेच हित साधले जाणार असल्याचे सांगितले.