संकेतस्थळ आणि अ‍ॅपचे लोकार्पण; विश्वकोशाचे १ ते २० खंडाची माहिती उपलब्ध

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने अद्ययावत केलेल्या ‘मराठी विश्वकोश ज्ञानमंडळ’ संकेतस्थळाचे आणि ‘मराठी विश्वकोश’ या मोबाइल अ‍ॅपचे लोकार्पण मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. बोरिवली पश्चिम येथील अटल स्मृती उद्यानात गुरुवारी हा सोहळा पार पडला. यानिमित्ताने विश्वकोशाचे १ ते २० खंड आणि कुमार विश्वकोश, इत्यादी माहिती डिजिटल स्वरुपात उपलब्ध झाली आहे.

संकेतस्थळ आणि अ‍ॅपमुळे विविध प्रकारच्या दर्जेदार माहितीचा खजिना अभ्यासक आणि संशोधकांना उपलब्ध झाला आहे. तसेच शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांनाही संदर्भासाठी हा विश्वकोश उपयुक्त ठरणार आहे. ‘मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे काम अतिशय व्यापक आहे. संकेतस्थळ आणि अ‍ॅपच्या सहाय्याने अतिशय दुर्मिळ आणि एकत्रित माहिती दृकश्राव्य पद्धतीने युवकांपर्यंत पोहोचवता येईल. मराठी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी तंत्रज्ञान व मराठी यांची सांगड घालण्याचा हा उपक्रम आहे. आगामी काळात मराठी विश्वकोश हा अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहचवणे हे खरे आव्हान आहे’, असे प्रतिपादन विनोद तावडे यांनी केले. या सोहळ्याला मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर आणि ज्ञानमंडळाचे तज्ज्ञ, अभ्यासक इत्यादी उपस्थित होते. विश्वकोशातील नोंदी अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे समन्वयक डॉ. प्रकाश खांडगे, स्थापत्य अभियांत्रिकीच्या समन्वयक डॉ.सुहासिनी माढेकर, प्राणिविज्ञान समन्वयक डॉ.मोहन भद्वण्णा, अभिजात भाषा आणि साहित्याच्या समन्वयक डॉ. सुनिला गोंधळेकर, संगीत विषयाचे समन्वयक डॉ.सुधीर पोटे, शिक्षणशास्त्र समन्वयक डॉ.कविता साळुंखे, अर्थशास्त्र ज्ञानमंडळाचे विषयपालक डॉ. नीरज हातेकर, डॉ.संतोष दास्ताने, डॉ.सुषमा देव, डॉ.शरद चाफे कर, डॉ. कला आचार्य, डॉ.वसंत वाघ, डॉ. अ. पां. देशपांडे, मेजर जनरल शशिकांत पित्रे, डॉ.अरुण भोसले, डॉ. हेमचंद्र प्रधान, डॉ. बाळ फोंडके  इत्यादींचा समावेश आहे.