मराठीत बोला अशी मागणी केल्याने मुंबईतील कुलाबा भागातल्या महावीर ज्वेलर्स मालकाने आपल्याला ढकलून दिलं असा आरोप लेखिका शोभा देशपांडे यांनी केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी या दुकानाबाहेर ठिय्या आंदोलनही पुकारले आहे. गुरुवारी दुपारपासून या लेखिका कुलाब्यातील महावीर ज्वेलर्सबाहेर येऊन बसल्या आहेत. शोभा रजनीकांत देशपांडे असं त्यांचं नाव आहे. मराठीत बोलण्याचा आग्रह धरल्याने महावीर ज्वेलर्स या दुकानदाराने आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली आणि दुकानाबाहेर ढकलून दिले असा त्यांचा आरोप आहे.

शोभा देशपांडे या गुरुवारी दुपारी कुलाबा परिसरातील महावीर ज्वेलर्स या ठिकाणी गेल्या होत्या. दुकानातील व्यक्ती त्यांच्याशी हिंदीतून बोलत होते. त्यांनी मराठीतून बोलावं अशी विनंती शोभा देशपांडे यांनी केली. मात्र त्यांनी मराठीत बोलण्यात नकार तर दिलाच शिवाय दागिने देण्यासही नकार दिला. तसंच पोलिसांच्या मदतीने दुकानाबाहेर ढकलून दिलं असा आरोप शोभा देशपांडे यांनी केला आहे.

ज्वेलर्स दुकानदाराने आपल्यासह मराठी भाषेचाही अपमान केला आहे. त्यामुळे ज्वेलर्स दुकानदारावर जोवर कारवाई होत नाही तोवर रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करणार आहे. सराफ आणि पोलीस या दोघांवरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शोभा देशपांडे यांनी केली आहे. शोभा देशपांडे यांनी थरारक सत्य इतिहास आणि इंग्रजी इंडिया हाच आपला खरा शत्रू या दोन पुस्तकांचं संकलन केलं आहे. त्या एक वृत्तपत्रही चालवत होत्या. त्यांचे पती भारतीय नौदलात होते. शोभा देशपांडे या गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेसाठी लढा देत आहेत. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या असेल्या मुंबई शहरात मराठी भाषेचा अपमान होत असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी मला कोणत्या अधिकाराने हात लावला? महिला पोलीसही मराठी होत्या त्यांनी मला ढकललं त्याचं मला वाईट वाटलंच शिवाय त्या दोघीही मुद्दामहून दुकानदाराशी हिंदीतून बोलत होत्या. मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे यांनीही त्यांची भेट घेतली. मागील २० तासांपासून शोभा देशपांडे यांचं आंदोलन सुरुच आहे.

शोभा देशपांडे यांना पोलिसांनी दिलेली वागणूक गैर आहे. तसंच ज्या महिला पोलिसांनी शोभा देशपांडे यांना ढकललं त्यांना चुकीची वागणूक दिली त्यांची चौकशी झाली पाहिजे. पोलिसांचं वर्तणूक अत्यंत चुकीची आहे असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.