उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
मुंबई: प्रत्येक करोनाबाधिताच्या मानसिक आरोग्याची तपासणी करण्याचे आरोग्य विभागाने नुकत्याच जाहीर के लेल्या रुग्णांमधील मानसिक समस्यांच्या उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सूचित के ले आहे. तसेच करोनाबाधित मनोरुग्णांचे निदान करण्यासाठी डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्याचे आदेशही यात दिले आहेत.
करोना रुग्णांमध्ये उद्भवणाऱ्या मानसिक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी आरोग्य विभागाने समिती गठित केली होती. या समितीने नुकतीच ही मार्गदर्शक तत्त्वे शासनाला सादर केली असून त्यानुसार उपाययोजना करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत.
रुग्णालयाव्यतिरिक्तही उपचार घेत असलेल्या प्रत्येक करोनाबाधित रुग्णाची तपासणी करून मानसिक समस्या आहेत का याची पडताळणी केली जावी. असे रुग्ण आढळल्यास तातडीने मानसोपचारतज्ज्ञांकडे पाठवावे. तज्ज्ञांनी अशा मनोरुग्णांसाठी स्वतंत्र उपचार पद्धतीचे नियोजन करावे. तसेच प्रत्येक रुग्णाच्या मानसिक आरोग्याची तपासणी, उपचार आणि इतर वैयक्तिक माहितीची मानसोपचारतज्ज्ञांनी नोंद ठेवावी; जेणेकरून उपचारादरम्यान किंवा त्यानंतरही संपर्क साधणे शक्य होईल असे सूचित केले आहे.
करोनाबाधित रुग्णांमध्ये मानसिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी रुग्णालयात मानसोपचार किंवा मानसशास्त्रज्ञांनी प्रत्येक रुग्णांचे आठवडय़ातून एकदा रुग्णांना समुपदेशन करावे. मनोरुग्णांचे निदान करण्यासाठी संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांसह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करावे. रुग्णांसाठी योग प्रशिक्षण ही उपलब्ध करावे. यासाठी जिल्’ाधिकाऱ्यांकडून निधीचा पुरवठाही केला जाईल असे यात म्हटले आहे.
आत्महत्या टाळण्यासाठी
आत्महत्या करण्याचा या आधी प्रयत्न केलेले किंवा तसे विचार येत असलेल्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करून तपासणी केली जावी. मानसोपचारतज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार केले जावेत. तसेच यांच्यावर सातत्याने देखरेख करावी. कात्री, ब्लेड इत्यादी धोकादायक वस्तू त्यांच्याजवळ ठेवू नयेत. कोणतीही औषधे त्यांच्याजवळ न ठेवता देखरेखीखाली दिली जावीत. अशा रुग्णांच्या खोलीत खिडक्यांना जाळी असावी. तसेच दरवाज्यांना कडय़ा नसाव्यात. रुग्ण पळून जाणार नाही यासाठी बाहेरून दरवाजा बंद करण्याची सोय असावी. रुग्ण शौचालयात जाताना त्यांच्यासोबत आरोग्य कर्मचाऱ्याने जावे, असे यात नमूद केले आहे.
जनजागृतीवर भर
करोना काळात ज्येष्ठ नागरिक, बालके आणि गरोदर मातांमध्ये मानसिक ताण निर्माण होण्याचा संभव अधिक असल्याने या वर्गात मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्यावर भर द्यावा.
मानसोपचारतज्ज्ञांची नेमणूक
रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञ नसल्यास खासगी तज्ज्ञांची नेमणूक करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यांचे मानधन करोनानिधीतून देण्यात येईल.
डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी..
गेले अनेक महिने सातत्याने सेवा देत असलेले डॉक्टर, परिचारिका यांच्यासह अन्य आरोग्य कर्मचारी यांच्यात कामाच्या अति तणावामुळे मानसिक ताण-तणाव किंवा तत्सम आजार निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून काही खबरदारीचे उपाय योजले जातील किंवा त्यांच्यातील तणाव दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 1, 2020 3:54 am