एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना दिवाळी भेट जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना २५०० तर अधिकाऱ्यांना ५ हजार रुपये  दिवाळी भेट म्हणून दिले जाणार आहेत. याशिवाय एसटी अधिकाऱ्यांना १० टक्के अंतरिम वेतनवाढ देण्याचा आणि एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीची ही भेट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तातडीने देण्यात यावी अशाही सूचना रावते यांनी दिल्या आहेत.

एसटी अधिकाऱ्यांच्या वेतनात त्यांच्या एकूण वेतनाच्या १० टक्के अंतरिम वाढ जाहीर करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०१८ पासून ही वेतनवाढ लागू होणार आहे. एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना नुकतीच मोठी वेतनवाढ दिली. याबाबत अभ्यास करून महामंडळाला शिफारस करण्यासाठी मंत्रालयातील निवृत्त अधिकाऱ्यांची दोन सदस्यीय समितीदेखील स्थापन करण्यात येणार आहे. दोन महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करेल अशीही माहिती समजते आहे.