इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजा पगार असलेल्या एसटी कामगारांनी २५ टक्के पगारवाढ मिळवण्यासाठी पुकारलेल्या संपाला गुरुवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. विदर्भ आणि मराठवाडय़ात हा संप बऱ्यापैकी यशस्वी ठरला असला, तरी कोकण, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र येथे या संपाचा प्रभाव अत्यल्प जाणवला. मात्र दुपापर्यंत प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.
एसटी कामगारांसह झालेल्या मागील वेतन करारात कामगार संघटनांनी २५ टक्के पगारवाढ मिळावी, अशी मागणी केली होती. प्रत्यक्षात या वेळी फक्त १३ टक्के पगारवाढ झाली होती. या कराराची मुदत मार्च २०१६ पर्यंत असून तोपर्यंत कामगारांना याच पगारावर समाधान मानावे लागणार आहे. हा करार झाला, त्या वेळी सर्वच कामगार संघटनांनी पगारवाढीबद्दल अभिनंदन केले होते. मात्र हा तुटपुंजा पगार मान्य नसलेल्या कामगार संघटनांनी उत्स्फूर्तपणे संपाची हाक देत संप केला होता.
एसटी कामगारांचे पगार २५ टक्के वाढवण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी संपकरी कामगारांनी केली. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा परिसरातील अनेक आगारांमधून एकही एसटी गुरुवारी बाहेर पडली नाही. मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र येथे काही आगारवगळता वाहतूक सुरळीत होती.
या संपाचा फटका प्रवाशांना थोडय़ाफार प्रमाणात बसला. मात्र दुपारनंतर बऱ्याच ठिकाणची वाहतूक सुरळीत सुरू झाल्याचा दावा एसटी प्रशासनाने केला आहे.