वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने शनिवारी सकाळी एका महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखलं होतं. चौकशी केली असता ही महिला आमदाराची पत्नी असल्याची माहिती समोर आली. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मानखुर्द पोलीस वाहतुकीचं नियोजन करत असताना एका दुचाकी चालकाने महिला ब्रीजवर चढली असून रडत असल्याची माहिती दिली.

यानंतर कॉन्स्टेबल ढगे यांना तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आलं. दरम्यान यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी कंट्रोल रुम, मानखुर्द पोलीस स्टेशन आणि नवी मुंबई पोलिसांना घटनेची माहिती दिली.

कॉन्स्टेबल ढगे यांनी घटनेची संवेदनशीलता लक्षात घेता महिलेसोबत चर्चा करुन त्यांना खाली उतरवत आत्महत्येपासून परावृत्त केलं. यानंतर महिलेला मानखुर्द पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तिथे महिलेने आपण आमदाराची पत्नी असल्याची माहिती दिली. कौटुंबिक वादामुळे आपण तणावात होतो असंही यावेळी त्यांनी सांगितलं. महिलेला नंतर नवी मुंबई पोलिसांकडे सोपण्यात आलं, ज्यांनी कुटुंबाशी संपर्क साधत सर्व घटनाक्रम सांगितला.