News Flash

किती चौकशा करायच्यात त्या करू द्या, माझं तोंड बंद ठेवणार नाही : राज ठाकरे

तब्बल साडेआठ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले.

फोटो: गणेश शिरसेकर

‘किती चौकशा करायच्यात त्या करू द्या, माझं तोंड बंद ठेवणार नाही, मी बोलतच राहणार. असा राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे. ईडीकडून चाललेल्या प्रदीर्घ चौकशीनंतर घरी परतल्यावर राज यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरे यांना ईडीने कार्यालयाने समन्स बजावलं होतं. त्यानंतर आज राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात आले होते. साडेआठ तास त्यांची चौकशी सुरु होती. उन्मेश जोशी, राजेंद्र शिरोडकर यांना जे प्रश्न विचारले गेले त्याच संदर्भातले प्रश्न ईडीने घेतल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांना पुन्हा चौकशीसाठी सामोरं जावं लागणार की नाही? हे स्पष्ट व्हायचे आहे. गरज पडल्यास राज ठाकरेंना पुन्हा बोलवण्यात येईल असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी जी काही उत्तरं दिली आहेत ती समाधानकारक आहेत असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मीडियाशी कोणताही संवाद न साधता ते कृष्णकुंज या ठिकाणी म्हणजेच त्यांच्या निवासस्थानी ते रवाना झाले होते. शर्मिला ठाकरे, उर्वशी ठाकरे, अमित ठाकरे हे वेगळ्या गाडीतून कृष्णकुंजवर गेले. उद्या राज ठाकरे यांना बोलवण्यात आलेले नाही असे ईडीच्या अधिकाऱ्यानी स्पष्ट केले. मात्र गरज पडल्यास राज ठाकरे यांना पुन्हा बोलवण्यात येईल असंही ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी चौकशीसाठी पूर्ण सहकार्य केले असंही ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

सकाळी साडेअकराच्या सुमारास राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते. १२ वाजता त्यांची चौकशी सुरु झाली. त्यानंतर रात्री सव्वा आठच्या सुमारास राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर आले. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही या ठिकाणी दाखल झाले होते. बाहेर आल्यानंतर त्यांनी मीडियाकडे पाहून फक्त स्मितहास्य केले आणि कारमध्ये बसून कृष्णकुंज या निवासस्थानी निघून गेले. साडेआठ तासांच्या चौकशीत राज ठाकरे यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी जे प्रश्न विचारले त्याची समाधानकारक उत्तरं राज ठाकरे यांनी दिली.

दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यालयाबाहेर आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेला दादरचा कृष्णकुंज परिसर, दक्षिण मुंबई तसेच संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच मुंबईतील काही ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते.

Live Blog
18:12 (IST)22 Aug 2019
साडेसहा तासांपासून सुरु आहे राज ठाकरेंची चौकशी

मनसेचे नेते राज ठाकरे यांची गेल्या साडेसहा तासांपासून ईडीकडून चौकशी सुुरु आहे. आज सकाळी ते चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही आले आहेत. आता मागील साडेसहा तासांपासून राज ठाकरेंची चौकशी सुरु आहे. 

15:54 (IST)22 Aug 2019
राज ठाकरेंच्या अटकेबद्दल राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य, म्हणाले...

राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी राज यांच्या चौकशीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

14:23 (IST)22 Aug 2019
शांतता बाळगणाऱ्या मनसैनिक आणि राज ठाकरेंचे कौतुक आणि टीकाही

राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे मनसे सैनिकांनी कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतला नाही. मुंबई तसेच ठाण्यातील अनेक भागांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त असला तरी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. येथे वाचा सविस्तर वृत्त...

13:44 (IST)22 Aug 2019
राज ठाकरेंची चौकशी अद्यापही सुरू

राज ठआकरे यांची गेल्या दोन तासांपासून कसून चौकशी सुरू आहे. तसेच ईडीच्या कार्यालयाबाहेरही मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

13:16 (IST)22 Aug 2019
राज ठाकरेंकडे एवढी संपत्ती कुठून आली?: अंजली दमानिया

राज यांची चौकशी याआधीच व्हायला हवी होती. तसंच राज ठाकरे यांच्या कमाईचे साधन काय?, त्यांच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली? असा सवालही दमानिया यांनी केला आहे.

वाचा सविस्तर- राज ठाकरेंकडे एवढी संपत्ती कुठून आली?: अंजली दमानिया

12:03 (IST)22 Aug 2019
राज ठाकरेंच्या चौकशीला सुरूवात

थोड्याच वेळापूर्वी राज ठाकरे हे ईडीच्या कार्यालयात पोहोचले आहेत. त्यांचे कुटुंबीय हे नजीकच्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. तसेच गेल्या 15 मिनिटांपासून त्यांची बंद दरवाज्याआड त्यांची चौकशी सुरू आहे. ईडीचे अधिकारी राज ठाकरे यांची चौकशी करत आहेत.

11:31 (IST)22 Aug 2019
राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात दाखल

राज ठाकरे हे ईडीच्या कार्यालयात पोहोचले. त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीयही कार्यालयाबाहेर उपस्थित. 

11:25 (IST)22 Aug 2019
राज ठाकरे सहकुटुंब सत्यनारायणाच्या पूजेला निघालेत का? - अंजली दमानिया

राज ठाकरे हे ईडीच्या कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले आहे. त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंबही कार्यालयाच्या दिशेने रवाना झालं आहे. काही क्षणातच ते कार्यालयात पोहोचणार आहेत. यावर अंजनी दमानिया यांनी टीका करत राज ठाकरे हे ईडीच्या चौकशीसाठी जात आहेत की सत्यनारायणाच्या पूजेसाठी सहकुटुंब जात आहेत, असा सवाल केला.

11:25 (IST)22 Aug 2019
राज ठाकरे सहकुटुंब सत्यनारायणाच्या पूजेला निघालेत का? - अंजली दमानिया

राज ठाकरे हे ईडीच्या कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले आहे. त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंबही कार्यालयाच्या दिशेने रवाना झालं आहे. काही क्षणातच ते कार्यालयात पोहोचणार आहेत. यावर अंजनी दमानिया यांनी टीका करत राज ठाकरे हे ईडीच्या चौकशीसाठी जात आहेत की सत्यनारायणाच्या पूजेसाठी सहकुटुंब जात आहेत, असा सवाल केला.

10:41 (IST)22 Aug 2019
राज ठाकरे ईडी कार्यालयाकडे रवाना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात कार्यालयात पोहोचणार. राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि सुपुत्र अमित ठाकरे हेदेखील त्यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयाकडे रवाना.

10:13 (IST)22 Aug 2019
मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात

मनसेचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनसे वाहतूक सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष आशिष डोके पोलिसांच्या ताब्यात. तसेच मनसे ठाणे शहर सचिव रवींद्र सोनार, मनसे प्रभागध्यक्ष विनायक रणपिसे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यापूर्वी सकाळी संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

10:09 (IST)22 Aug 2019
VIDEO: मुंबईत पोलिसांचा चोख बंदोबस्त

09:56 (IST)22 Aug 2019
शर्मिला ठाकरेही ईडीच्या कार्यालयात जाणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी आणि त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे राज यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयात जाणार. राज हे सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत.

09:49 (IST)22 Aug 2019
मुंबईतील काही भागांमध्ये जमावबंदी

मुंबईतील काही भागांमध्ये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. यामध्ये मुंबईतील एमआरए मार्ग पोलीस ठाणे, आझाद मैदान पोलीस ठाणे , दादर पोलीस ठाणे आणि मरीन ड्राईव्ह या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

09:46 (IST)22 Aug 2019
दक्षिण मुंबईत पोलिसांचा चोख बंदोबस्त (फोटो : गणेश शिरसेकर)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 11 वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दक्षिण मुंबईत तसेच आदोलनाच्या संभाव्य ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

09:37 (IST)22 Aug 2019
बेस्टला जाळ्यांचं संरक्षण

राज ठाकरे हे आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बेस्ट बसेसची तोडफोड होऊ नये यासाठी बेस्ट बसेसना जाळ्या लावण्यात आल्या आहेत. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मनसे कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. तसेच लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलं आहे.

09:35 (IST)22 Aug 2019
बाळा नांदगावकर कृष्णकुंजकडे रवाना

मनसे नेते बाळा नांदगावकर राज यांच्या निवासस्थानी रवाना. मनसे कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाकडे जाणार नाहीत. तसेच कार्यकर्त्यांनी शांतता राखण्याचे नांदगावकर यांचे आवाहन. नांदगावकर कृष्णकुंजवरच थांबणार

09:30 (IST)22 Aug 2019
या घोटाळेबाजांना कधी 'नोटीस' पाठवणार; लालबागमध्ये पत्रकांचं वाटप

कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर लालबाग परळ परिसरात ईडीविरोधात अज्ञातांनी काही पत्रकं वाटल्याचा प्रकार समोर आला आहे. या घोटाळेबाजांना कधी 'नोटीस' पाठवणार अशा आशयाची पत्रकं लालबाग परळ परिसरात वाटल्याची पहायला मिळाली.

09:26 (IST)22 Aug 2019
मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू

पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

09:00 (IST)22 Aug 2019
मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Next Stories
1 मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात
2 राज ठाकरे आज ईडीच्या कार्यालयात; पोलिसांचा चोख बंदोबस्त
3 भाज्यांची शंभरी, कांदाही महाग
Just Now!
X