भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी फायटर विमानांना प्रत्युत्तर देताना भारतीय हवाई दलाचा एक वैमानिक बेपत्ता झाला. या वैमानिकाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. बेपत्ता असलेला वैमानिक लवकरात लवकर सुरक्षित भारतात यावा अशी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रार्थना करतो असे राज यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. #BringBackAbhinandan हा हॅशटॅगही त्यांनी आपल्या टि्वटमध्ये वापरला आहे.

पाकिस्तानी फायटर विमानांवर प्रतिहल्ला चढवताना भारताचे एक मिग-२१ विमान कोसळले व वैमानिक बेपत्ता झाला. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार या वैमानिकाचं नाव अभिनंदन वर्थमान असून पाकिस्तानी सुरक्षा दलांनी विंग कमांडर अभिनंदन यांचा व्हिडिओ देखील जारी केला आहे. सदर व्हिडीओची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही.

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी देखील बेपत्ता वैमानिकाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानने जीनेव्हा कराराचा आदर करुन नियमांचे पालन करावे असे सुद्धा ओवेसी यांनी म्हटले आहे. या कठिण काळात हवाई दलाचा तो शूर वैमानिक आणि त्याच्या कुटुंबासाठी आम्ही प्रार्थना करतो असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.