महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बहुचर्चित रास्ता रोको आंदोलन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर बुधवारी दुपारी स्थगित करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांना गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर चर्चेसाठी बोलावले आहे. मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा झाल्यानंतर राज ठाकरे यांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले.

टोलवसुलीमध्ये पारदर्शकता नसल्याच्या आरोपावरून राज ठाकरे यांनी बुधवारी राज्यभरात रास्ता रोको करण्याचे ठरविले होते. बुधवारी सकाळपासूनच राज्याच्या वेगवेगळ्या भागात मनसेच्या नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली रास्तारोको करण्यात आले. राज ठाकरे स्वतः वाशी टोलनाक्याकडे जाताना चेंबूरजवळ त्यांच्या गाड्यांच्या ताफ्याला पोलिसांनी अडविले. राज ठाकरे यांना पुढे जाता येणार नाही आणि त्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आम्हाला ताब्यात घ्यायचे आहे, असे पोलीसांनी यावेळी सांगितले. मनसेचे आमदार बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी आम्ही शांततेत आंदोलन करीत असून, आम्हाला जाऊ देण्यात यावे, असे पोलीसांना सांगितले. मात्र, पोलीस त्यांचे ऐकण्यास तयार नव्हते. त्यानंतर राज ठाकरे यांच्यासह नांदगावकर आणि सरदेसाई यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन पोलीसांच्या गाडीतून त्यांना आरसीएफ पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

राज ठाकरे यांनी पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. सुमारे दीड ते दोन तास राज ठाकरे पोलीस ठाण्यामध्ये होते. राज ठाकरे यांना ताब्यात घेतल्याचे कळताच मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह इतरत्र दगडफेकीच्या काही घटना घडल्या. यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि त्यांना गुरुवारी सकाळी नऊ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चर्चेसाठी निमंत्रित केले. मुख्यमंत्र्याशी झालेल्या चर्चेनंतर राज ठाकरे यांना पोलीसांनी सोडून दिले. मुख्यमंत्र्यांशी चर्चेसाठी उद्या सकाळी आपण जाणार आहोत. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, असे राज ठाकरे यांनी पोलीसांच्या ताब्यातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांना सांगितले. बुधवारचे रास्ता रोको आंदोलन यशस्वी झाल्याचा दावाही राज ठाकरे यांनी यावेळी केला.
फोटो गॅलरी: टोलविरोधात मनसे आक्रमक