पादचारी पुलावर उभ्या असलेल्या एका दहा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना माहीम स्थानकात काही दिवसांपूर्वी घडली होती. ही घटना उघड होताच मुलीच्या नातेवाईकांनी मुंबई सेन्ट्रल लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार नोंदविली. तपासानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. परमजीत सिंग असे आरोपीचे नाव असून तो मूळचा पंजाबमधील राहणारा आहे.

माहीम मच्छीमार कॉलनी येथे राहणारी दहा वर्षीय मुलगी १० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास प्रभादेवी येथील शाळेत जाण्यासाठी निघाली. सोबत तिचे काका आणि तिची मैत्रीणही होती. टॅक्सीने माहीम स्थानकापर्यंत आल्यानंतर मुलीचे काका हे टॅक्सीचे बिल देत होते. त्याच वेळी दोघीही माहीम स्थानकातील (दादर दिशेने) पादचारी पुलावर जाऊन उभ्या राहिल्या. तेव्हा पुलावरून जाणाऱ्या परमजीत सिंगने यातील एका मुलीला अक्षेपार्ह स्पर्श करून विनयभंग केला व तेथून पळ काढला. शाळेतून आल्यानंतर त्रास होऊ लागल्याने तिला डॉक्टरकडे तपासणीसाठी नेण्यात आले. त्या वेळी ही बाब उघड होताच मुलीनेही घडलेली घटना सांगितली.  माहीम येथून  परमजीतला अटक करण्यात आल्याचे मुंबई सेन्ट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धिवार यांनी सांगितले.