तसे पाहायला गेले तर सर्वच पशुपक्षी, झाडे कमी अधिक फरकाने पावसाची वाट पाहत असतात. झाडांच्या बहरातूनही पावसाचा अदमास लागतो. पाऊस पडायला सुरुवात झाली की मग सर्वच प्राणी त्याला वेगवेगळ्या पद्धतीने सामोरे जातात. माणसाच्या सभोवतीची सृष्टी पावसासाठी चहूबाजूंनी तयारी करत असते. पण आताशा मात्र यातील अनेक गोष्टी आपल्या नजरेआडच होतात.

साधारण आठवडय़ाभरापूर्वी मुंबईत नवरंग दिसल्याचे समजले. नावाप्रमाणेच चमकदार विविध रंग ल्यायलेला हा ठेंगणाठुसका पक्षी हिमालयातून दक्षिणेकडे स्थलांतर करतो. दक्षिणेकडच्या प्रवासात तो साधारणत: जूनच्या पहिल्या पंधरवडय़ात राज्यात दिसतो. याच दिवसांमध्ये पाऊस प्रवेश करत असल्याने नवरंगच्या दिसण्याचा व पावसाच्या आगमनाचा संबंध जोडला गेला असावा. दाट जंगलांमध्ये जमिनीवर उतरून अन्न हुडकण्याची सवय असलेला नवरंग मुंबईच्या राष्ट्रीय उद्यानात, आरे कॉलनीत दिसला की पक्षीप्रेमींमध्ये त्याची वार्ता वाऱ्यापेक्षाही अधिक वेगाने पसरते. ठाणे, नवी मुंबई, पनवेल येथील दाट झाडींमध्येही हा पक्षी नजरेस पडतो. नवरंगप्रमाणेच फार फार वर्षांपूर्वीपासून चातकाचाही पावसाशी संबंध लावला गेला आहे. कालिदासाच्या मेघदूतामुळे हा पक्ष्याने भारतीय साहित्यात मानाचे स्थान पटकावले आहे. हा पक्षी फक्त पावसाचेच पाणी पितो ही कथा कल्पित असली तरी चातकाच्या आगमनाचा आणि पावसाचा संबंध गहिरा आहे. समुद्रावरून हजारो मैल प्रवास करून दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवरून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून येणाऱ्या या पक्ष्याविषयी फारसे संशोधन झालेले नाही. मात्र पावसाच्या वाऱ्यांची मदत घेऊन हा पक्षी समुद्रावरील प्रवास एका टप्प्यात पार पाडत असावा, असा कयास पक्षीतज्ज्ञांना वाटतो. त्यामुळे पाऊस पडण्यापूर्वी हा मुंबई परिसरात दिसतोच दिसतो. हा पक्षीही साधारण मे महिन्याच्या अखेरीस दृष्टीस पडला होता. हे दोन्ही पक्षी दिसल्याने पाऊस जवळच असल्याच्या चर्चाना बळकटी मिळाली होती. चातक आणि नवरंगही अनेक कथा जोडल्या गेल्याने आणि हे जीव दिसायलाही सुंदर असल्याने चर्चेचा विषय होतात. पण पावसाच्या आगमनाची वर्दी काही फक्त हे दोनच पक्षी देतात असे नाही. पण आकाशातील हे पाहुणे जमिनीवर हक्क सांगत नसल्याने माणसाला ते आवडतात बहुतेक.

कारण तसे पाहायला गेले तर सर्वच पशुपक्षी, झाडे कमी अधिक फरकाने पावसाची वाट पाहत असतात. झाडांच्या बहरातूनही पावसाचा अदमास लागतो. पांगारा, पळस, गुलमोहोर यांच्या लालचुटूक फुलांचा बहर आणि बहाव्याच्या सोनपिवळ्या फुलांचे घोस लगडू लागले की पाऊस साधारण तीन-चार आठवडय़ांवर आल्याचे समजते. अंडी घेऊन पळणाऱ्या मुंग्या, झाडावर घरटे बांधणारा कावळा पावसासाठी तयारी करत असतात. साप, सरडे यांच्या हालचाली उकाडा वाढल्यावर वाढतात. बिळात राहणारे उंदीर, विंचू असे प्राणी पावसासाठी दक्ष होतात. माणसाच्या सभोवतीची सृष्टी पावसासाठी चहूबाजूंनी तयारी करत असते.

पाऊस पडायला सुरुवात झाली की मग सर्वच प्राणी त्याला वेगवेगळ्या पद्धतीने सामोरे जातात. वर्षभर गायब झालेले बेडूक गायला सुरुवात करतात. रातकिडय़ांचा आवाज वाढतो. दिव्याभोवती कीटक पिंगा घालायला लागतात. बिळात पाणी शिरले की मग प्राणी पटापट बाहेर पडू लागतात. झुरळांची संख्या अमाप वाढते. गांडुळे, कानेटी मोरीमध्ये दिसू लागतात. अनेक रंगबेरंगी किडे झुडपांवर दिसू लागतात, काही घरातही येतात. हे सर्व आपल्या आजूबाजूलाच घडत असते. त्यासाठी जंगलात पावसाळी शिबिरांना वगैरे जाण्याची गरज नसते. आपल्यापैकी बहुतेक सर्वानी लहानपणी हे अनुभवलेलेही आहे. पण आताशा मात्र यातील अनेक गोष्टी आपल्या नजरेआडच होतात. म्हणजे प्राण्यांच्या हालचाली बदलल्या नाहीत. पण हल्ली हे प्राणी नजरेस पडण्याचे प्रमाणच कमी झाले आहे. त्याची अनेक कारणे असू शकतात. एकतर लहान वयातील स्वाभाविक कुतूहल आपण गमावले असेल. कदाचित रोजच्या कामाच्या दगदगीत हे बदल पाहायला आणि अनुभवण्याला प्राधान्य द्यावेसे वाटत नसेल किंवा कदाचित सृष्टीतीत हे बदल फार मोठय़ा प्रमाणात होत नसतील.

यातील पहिली दोन कारणे वैयक्तिक आहेत, तर तिसरे कारण वैयक्तिक व सामाजिकही आहे. शहरातील मातीच गेल्या दशकभरात वेगाने कमी झाली आहे. मातीचे सिमेंटीकरण झाल्याने मातीच्या आडोशाला राहणारे हे प्राणी शहरापासून लांब गेले आहेत. जमिनीवर पहिला व शेवटचा हक्क माणसांचा आहे याची त्यांना कदाचित जाणीव झाली असावी किंवा ती आपण करून दिली आहे. त्यामुळे पहिल्या पावसातील बेडकांचे डराव डराव हे क्षीण कण्हल्याप्रमाणे ऐकू येते. टॉवरच्या पायऱ्या चढून गांडूळ सातव्या आठव्या मजल्यावरच्या घरापर्यंत पोहोचू शकत नाहीत.

मुंग्या, झुरळांचा बंदोबस्त करायला शक्तिशाली कीटकनाशके आली आहेत. पावसाळ्यातील रातकिडय़ांचा आवाज तर टीव्हीच्या कलकलाटात केव्हाच गायब झाला आहे. मोर तर शहरात सापडण्याची शक्यता नाहीच, त्यामुळे त्यांच्याबाबत काही बोलता येत नाही. साप, विंचू वगैरे तर शत्रूच. त्यामुळे त्यांचा पुरता बंदोबस्त केला जातो. आजूबाजूच्या सृष्टीसोबत फटकून राहण्याचा विडाच आपण उचलल्याने पावसाचा आनंद फक्त गारवा, पिण्याचे पाणी व अन्नधान्याची स्वस्ताई एवढय़ापुरताच राहिला आहे. पाऊस पडला की अजूनही मुलांना रेनकोट न घालता भिजायला पाठवतो हीच त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट.

prajakta.kasale@expressindia.com