25 September 2020

News Flash

मान्सून उंबरठय़ावर..

३ ते ७ जूनदरम्यान मान्सून केरळमध्ये पोहोचणार असल्याचे वेधशाळेच्या कृषीविषयक अंदाजपत्रात म्हटले आहे.

केरळमध्ये ३ ते ७ जूनपर्यंत; मुंबईत १० जूननंतर
अंदमानात वेळेवर दाखल झालेला मान्सून केरळपासून पुढचा प्रवास मात्र विलंबाने करणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज खरा ठरण्याची शक्यता असून आता खासगी संस्था स्कायमेटनेही मुंबईतील मान्सून प्रवेशाची तारीख १२ ते १३ जून असल्याचे मान्य केले आहे. गेले दहा दिवस अंदमानात जोरदार वृष्टी करणारे मान्सूनचे वारे अजूनही पुढे सरकलेले नाहीत. ३ ते ७ जूनदरम्यान मान्सून केरळमध्ये पोहोचणार असल्याचे वेधशाळेच्या कृषीविषयक अंदाजपत्रात म्हटले आहे.
उकाडय़ाने हैराण झालेले मुंबईकर आणि पाण्याच्या थेंबाथेंबाची प्रतिक्षा करणारी मराठवाडय़ातील जनता पावसाची आसुसलेपणाने वाट पाहत आहे. दोन वर्षे दुष्काळ सहन केल्यानंतर यावेळच्या सरासरीपेक्षा जास्त पडणाऱ्या पावसाचा प्रवेश नेमका कधी होतो यासाठी सर्व खोळबंले आहेत. अंदमानात १८ मे रोजी पाऊस सुरू होऊनही गेले दहा दिवस तो पुढे सरकलेला नाही. दरवर्षी साधारण १ जून दरम्यान मान्सून केरळमध्ये येतो आणि त्यानंतर साधारण आठवडाभरात महाराष्ट्रासह मुंबईत प्रवेश करतो. यावेळी मात्र मान्सून केरळमध्ये सात जून रोजी प्रवेश करेल, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला होता. या अंदाजात चार दिवसांचा फरक ग्राह्म धरण्यात येतो. स्कायमेट या खासगी संस्थेने मात्र मान्सून नेहमीप्रमाणे म्हणजे २८ ते २९ मे रोजी केरळात दाखल होईल, असा अंदाज सांगितला होता. मात्र अजूनपर्यंत मान्सून केरळात पोहोचलेला नाही. सध्या देशाच्या दक्षिण अगदी टोकावर तसेच ईशान्य भारतात पाऊस सुरू झाला असला तरी केरळ व कर्नाटकमध्ये ३ ते ७ जूनपर्यंत पाऊस पोहोचेल असे केंद्रीय वेधशाळेच्या कृषी संशोधनाशी संलग्न असलेल्या विभागाने जाहीर केलेल्या अंदाजात म्हटले आहे.
मान्सून उशिरा पोहोचणार असला तरी त्यानंतर मात्र महाराष्ट्रात चांगला पाऊस असल्याचे वेधशाळेने सांगितले आहे. पुढील पंधरवडय़ात केरळ व कर्नाटकमध्ये सामान्य तर मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या दरम्यानच्या काळात मुंबईसह कोकणात मान्सूनपूर्व सरी येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 2:14 am

Web Title: monsoon onset delayed till 10 june
टॅग Monsoon
Next Stories
1 वाशीमध्ये लोकसत्ता ‘मार्ग यशाचा’ !
2 चिदम्बरम यांना राज्यसभेची उमेदवारी
3 राहुल यांच्यावर तोफ डागूनही सोनियांमुळे संधी
Just Now!
X