News Flash

मान्सूनच्या माघारीस सुरुवात

महिनाभर वाट पाहायला लावून सर्वाच्या तोंडचे पाणी पळवणारा परंतु नंतर धो धो कोसळणाऱ्या मान्सूनचा परतीचा प्रवास आता सुरू झाला आहे.

| September 27, 2014 05:35 am

महिनाभर वाट पाहायला लावून सर्वाच्या तोंडचे पाणी पळवणारा परंतु नंतर धो धो कोसळणाऱ्या मान्सूनचा परतीचा प्रवास आता सुरू झाला आहे. राजस्थान आणि गुजरातमधून बाहेर पडलेला पाऊस येत्या दोन ते तीन दिवसात मध्य भारतातून माघारी फिरणार आहे. अरबी समुद्रावरील स्थिती पाहता आणखी आठवडाभर कोकण व पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या तुरळक ते मध्यम सरी कोसळण्याची
शक्यता आहे.
केरळमध्ये ६ जून रोजी दाखल झालेला मान्सून राज्यात १५ जूनला आला खरा, मात्र त्यात म्हणावा तसा जोर नव्हताच. त्यानंतर तीन आठवडे पाऊस गायब होता. जून जवळपास कोरडाच गेला. जुलैच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत पावसाचा मागमूसही नव्हता त्यामुळे राज्यावर दुष्काळाचे ढग निर्माण झाले होते. परंतु त्यानंतर मुंबई, ठाण्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात पावसाने चांगला जोर धरला. जुलैचा अखेरचा आठवडा व ऑगस्टचे पहिले दोन आठवडे मुसळधार बरसलेल्या पावसाने कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडवला. मराठवाडय़ातील बहुतांश भागात मात्र पावसाची कामगिरी सरासरीपेक्षा ३० टक्क्य़ांहून कमी झाली.
ऑगस्टच्या अखेरच्या आठवडय़ानंतर पावसाने हात आखडता घेतला. मात्र देशाच्या उत्तर भागात मात्र पाऊस सुरू होता. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात काश्मीरमध्ये पूर आणलेल्या पावसाने २३ सप्टेंबर रोजी राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. शुक्रवारी तो पंजाब, हरयाणा आणि गुजरातमधील काही भागातून परतला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात मध्य भारतातूनही मान्सून परतण्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने जाहीर केला आहे. त्याचवेळी दक्षिण भारतात केरळ, तामिळनाडू व कर्नाटकच्या अंतर्गत भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात अपुरा पाऊस
लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, परभणी, िहगोली, वाशिम, जालना, औरंगाबाद येथे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा २५ ते ५० टक्के कमी राहिले. नंदुरबार येथेही पावसाची सरासरीपेक्षा केवळ ७२ टक्के नोंद झाली आहे.
मान्सून राजस्थानमधून परतला आहे. राज्यातून मान्सून परतण्यास काही दिवस लागतील. अरबी समुद्रावरील हवामानाच्या स्थितीमुळे मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असून पावसाच्या तुरळक सरी येतील, मात्र मुसळधार पावसाची शक्यता नाही.
– व्ही. के. राजीव, मुंबई हवामानशास्त्र विभागाचे संचालक

मुंबईत सरासरीच्या ९८%
*पावसाची वार्षिक सरासरी सांताक्रूझ येथे २३५० मिमी तर कुलाबा येथे २१६० मिमी आहे. २६ सप्टेंबरपर्यंत सांताक्रूझ येथे २२९९ मिमी तर कुलाबा येथे २१३५ मिमी पाऊस पडला.
*हा पाऊस वार्षिक सरासरीपेक्षा एक ते दोन टक्के कमी असला तरी
२६ सप्टेंबरपर्यंत पडत असलेल्या सरासरी पावसापेक्षा जास्त आहे. ठाण्यात पावसाने सरासरीपेक्षा दोन टक्के अधिक कामगिरी केली आहे. रत्नागिरीत वार्षिक सरासरीच्या ८३ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 5:35 am

Web Title: monsoon returns
टॅग : Monsoon
Next Stories
1 डॉकयार्ड इमारत दुर्घटनेला एक वर्ष
2 राज्यपाल सक्रिय!
3 वडाळा, शिवडीत आज पाणी नाही
Just Now!
X