रक्तद्रव (प्लाझ्मा) उपचारासाठी करोनामुक्त रुग्णाच्या शरीरातून घेतलेल्या रक्तद्रवात प्रतिपिंड (अ‍ॅण्टिबॉडीज) विशिष्ट प्रमाणात असेल तरच ते रुग्णाला देण्यात यावे, असे आदेश केंद्रीय आरोग्य सेवा महासंचालक (डीजीएचएस) विभागाने दिले असले तरी त्याचे प्रमाण मोजणारी ‘टायटर’ चाचणी सर्वत्र उपलब्ध नसल्याने प्रयोगशाळांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

गंभीर करोना रुग्णाला रक्तद्रव (प्लाझ्मा) उपचार देण्यातील अडचणी वाढतच आहे. करोनामुक्त रुग्ण रक्तद्रव दान करण्यासाठी फारसे पुढे येत नसल्यामुळे संकलनाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. रक्तद्रव दानाआधी तो रुग्णास देण्यायोग्य असल्याची खात्री करण्यासाठी चाचणी करावी लागते. खात्री पटल्यानंतर दात्यास रक्तद्रव दान करण्यास बोलावले जाते. दोन वेळा यावे लागत असल्याने दाते पुढे येत नाहीत. शिवाय, टाळेबंदी असल्याने प्रवासाची अडचण आणि पुन्हा संसर्गाची भीती या कारणांमुळेही दात्यांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही, असे शासकीय रुग्णालयांशी संलग्न प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.  रक्तद्रव उपचार पद्धतीचा वापर सध्या नायर, केईएम, कस्तुरबा, एच. एन. रिलायन्स या रुग्णालयांमध्ये सुरू आहे. ही उपचारपद्धती वापरण्यास मुभा दिल्याचे ‘डीजीएचएस’ने जाहीर केले आहे. परंतु रक्तद्रवामध्ये प्रतिपिंड मात्रा १: ६४० हून अधिक असावी, अशी अट घालण्यात आली आहे.

‘टायटर’ चाचणी देशात सर्वत्र उपलब्ध नसतानाही ‘डीजीएचएस’ने ती करण्याची अट घालून रक्तद्रव चाचणीस परवानगी दिली आहे. परंतु प्रयोगशाळा क्वॉलिटेटिव्ह चाचणीवर निभावून नेत आहेत. त्यामुळे दर्जेदार रक्तद्रव रुग्णांना दिला जात आहे. परंतु एखाद्या रुग्णाबाबत काही बरेवाईट घडल्यास ‘टायटर’ चाचणी का केली नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. जी चाचणी उपलब्धच नाही ती करणार कशी, असा प्रश्न ‘प्लाटिना’सारखा मोठा प्रकल्प राबविणाऱ्या राज्य सरकारलाही पडलेला नाही याचे आश्चर्य वाटते, असे मत शासकीय रुग्णालयातील रक्तसंक्रमण विभागातील वरिष्ठ प्राध्यापकांनी व्यक्त केले.

केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार!

मुंबईतील रक्तपेढय़ांची अडचण आरोग्य विभागाकडे मांडली असून याबाबत बैठकही झाली आहे. सध्या टायटर चाचणी उपलब्ध नसल्याने यातून काही मार्ग काढण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य विभागाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

अटीचा जाच

‘डीजीएचएस’च्या सूचनेनुसार रक्तद्रवात प्रतिपिंड प्रमाण १:६४०हून अधिक नसेल तर प्रयोगशाळा रुग्णालयांना रक्तद्रव देऊ शकत नाहीत. त्यामुळे सध्या रुग्णालयांशी संलग्न प्रयोगशाळाच रक्तद्रव संकलित करून देत आहेत. परंतु ‘डीजीएचएस’च्या अटीमुळे कोणतीही प्रयोगशाळा अन्य रुग्णालयांना रक्तद्रव देऊ शकणार नाही. त्याचबरोबर रक्तद्रवाची विक्रीही प्रयोगशाळांना करता येणार नाही. तरीही अनेक ठिकाणी रक्तद्रव विक्रीचे प्रकार घडत आहेत.

‘टायटर’ चाचणी देशात एकाच ठिकाणी

रक्तद्रवात आवश्यक प्रतिपिंडे आहेत का याची चाचणी सध्या प्रयोगशाळांमध्ये केली जाते. तिला ‘क्वॉलिटेटिव्ह अण्टिबॉडी’ चाचणी म्हणतात. परंतु, रक्तद्रवात करोना प्रतिपिंडांचे प्रमाण किती आहे, हे निश्चित करणारी ‘टायटर’ चाचणी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेव्यतिरिक्त (एनआयव्ही) देशात कोठेही केली जात नाही. या चाचणीचे संच (किट) सध्या बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामुळे ही चाचणी न करताच प्रयोगशाळा रक्तद्रव संकलित करत असल्याचे पालिका रुग्णालयाच्या रक्तसंक्रमण विभागाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.