राज्यातील करोनाबाधितांचा आलेख पुन्हा वर जाऊ लागला असून, गेल्या २४ तासांत ५,४२७ नव्या रुग्णांची नोंद झाली. विदर्भ, पुण्याबरोबरच मुंबई, ठाण्यातही रुग्णसंख्येत वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणा सावध झाली आहे. एक-दोन दिवसांत काही प्रमाणात निर्बंध लागू करण्याच्या हालचाली सरकारच्या पातळीवर सुरू आहेत.
गेल्या २४ तासांत राज्यात ५४२७ नवे रुग्ण आढळल्याने सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली. नोव्हेंबरनंतर प्रथमच एका दिवशी पाच हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दिवसभरात ३८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.
दिवसभरात मुंबई ७३६, ठाणे २०३, पुणे शहर ४६७, पिंपरी-चिंचवड १७१, अमरावती शहर ५४२, अमरावती जिल्हा १९१, अकोला शहर १५२, नागपूर शहर ६००, बुलढाणा १४४, यवतमाळ १३१, वर्धा १०२ नवे रुग्ण आढळले. राज्यात ४० हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
राज्यातील करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याची सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. मुंबई महानगरपालिकेने काही कठोर निर्णय घेतले. याशिवाय राज्याच्या अन्य भागांतही कठोर निर्बंध लागू करण्याचा प्रस्ताव आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येत्या एक-दोन दिवसांत काही निर्णय जाहीर करतील, असे सांगण्यात आले. मुंबई, ठाणे व आसपासच्या परिसरातील रुग्णसंख्येत वाढ झाल्याने सर्वसामान्यांना रेल्वे प्रवासास परवानगी दिल्याचे परिणाम आहेत का, याची चाचपणी आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
देशात १२,८८१ नवे बाधित
देशात गेल्या २४ तासांत करोनाचे १२,८८१ रुग्ण आढळले तर १०१ रुग्णांचा मृत्यू झाला. देशाची एकूण रुग्णसंख्या १,०९,५०,२०१ वर पोहोचली आहे. त्यातील १०६५६८४५ रुग्ण करोनामुक्त झाले असून, हे प्रमाण ९७.३२ टक्के आहे. करोनाबळींची संख्या १,५६,०१४ झाली आहे. मृतांचे हे प्रमाण १.४२ टक्के आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 19, 2021 12:43 am