रेल्वे विकास महामंडळाची रेल्वे मंत्रालयाकडे मागणी

मुंबई : सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग, २१० वातानुकूलित लोकल गाडय़ा, पनवेल ते विरार उपनगरीय मार्ग आदी उपनगरीय लोकल सेवा अधिक बळकट करणाऱ्या ५४ हजार कोटी रुपयांच्या ‘एमयूटीपी- ३ ए’ या प्रकल्पाला गती मिळावी यासाठी मुंबई रेल विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) रेल्वे मंत्रालयाकडे १०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. या प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली नसली तरी प्रकल्पांचे सर्वेक्षण व अन्य काही प्राथमिक कामे रखडू नये म्हणून आधीच या निधीची मागणी करण्यात आल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ५४ हजार कोटी रुपयांच्या एमयूटीपी-३ए प्रकल्पांना मंजुरी मिळाली. सध्या हा प्रकल्प निती आयोगाकडे असून त्यानंतर त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळणे सर्वंकषजेचे आहे. त्यासाठी सर्वप्रथम रेल्वेकडून प्रस्ताव येणे आवश्यक होते. या प्रकल्पात सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग, २१० वातानुकूलित लोकल गाडय़ा, पनवेल ते विरार उपनगरीय मार्ग, गोरेगाव ते बोरिवलीपर्यंतच हार्बरचा विस्तार, नवीन सिग्नल यंत्रणा (सीबीटीसी), बोरिवली ते विरार पाचवा-सहावा मार्ग, कल्याण ते आसनगाव चौथा मार्ग, कल्याण ते बदलापूर तिसरा व चौथा मार्ग यासह आणखी काही प्रकल्पांचा समावेश आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळेपर्यंत ‘एमयूटीपी-३ ए’ला विलंब होऊ शकतो. तत्पूर्वी प्रकल्पांचे सर्वेक्षण व अन्य काही प्राथमिक कामे करावी लागणार आहेत. ती आधी सुरू करता यावी यासाठी निधीची आवश्यकता आहे. त्याकरिता १०० सुरुवातीला १०० कोटी रुपये द्यावे. जेणेकरून प्रकल्पांची किरकोळ कामे पुढे सरकण्यास मदत होईल, अशा मागणीचे पत्र एमआरव्हीसीकडून रेल्वे मंत्रालयाला नुकतेच पाठवण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्यापूर्वी हा निधी मिळणे कठीण आहे. तरीही एमयूटीपी-३ ए मध्ये बरेच महत्त्वाचे प्रकल्प असून त्याची किरकोळ कामे थांबू नयेत, यासाठीच प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या आधीच्या एमयूटीपी-३ या ११ हजार कोटी रुपये प्रकल्पांच्या कामातील ऐरोली ते कळवा लिंक रोड प्रकल्पामधील दिघा स्थानक सोडता अन्य कोणत्याही कामांना गती मिळालेली नाही. सर्व प्रकल्प हे निविदा प्रक्रियेतच अडकले आहेत. २० डिसेंबर २०१६ मध्ये एमयूटीपी-३ ला मंजुरी मिळूनही बरेच प्रकल्प रखडलेले आहेत. यामध्ये विरार-डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत नवीन मार्ग अशा प्रकल्पांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त एमयूटीपी-२ मधील ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग, मुंबई सेन्ट्रल ते बोरिवली सहावा मार्ग, सीएसएमटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग हे प्रकल्पही मार्गी लागलेले नाहीत. त्यातच आता एमआरव्हीसीने १०० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

* एमयूटीपी-३ ए’मध्ये नेमके आहे काय?

* सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग

* २१० वातानुकूलित लोकल गाडय़ा

* पनवेल ते विरार उपनगरीय मार्ग

* गोरेगाव ते बोरिवलीपर्यंतच हार्बरचा विस्तार

* नवीन सिग्नल यंत्रणा (सीबीटीसी)

* बोरिवली ते विरार पाचवा-सहावा मार्ग

* कल्याण ते आसनगाव चौथा मार्ग

* कल्याण ते बदलापूर तिसरा व चौथा मार्ग