मुंबई विमानतळ क्षमतेपक्षा जास्त प्रवासीसंख्या हाताळत आहे म्हणून कौतुक करण्यापेक्षाही राजकीय व प्रशासकीय थंडगार यंत्रणेला बोल लावणे अधिक उचित आहे. अक्षरश: लागोपाठोपाठ विमाने उतरवणाऱ्या वैमानिक व वाहतूक नियमन कर्मचाऱ्यांचे कौतुक करतानाच एवढय़ा प्रवाशांचे जीव धोक्यात घालणाऱ्या यंत्रणांचे अपयश नक्कीच लपवता येण्यासारखे नाही. मुंबईत विमानतळाकडे जाण्यासाठी होणारा खर्च व लागणारा वेळही सर्वसामान्यांना परवडणारा नाही. प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक परिस्थितीचा हा निर्देशांक लक्षात घेतला असता तर मुंबईला पहिले स्थान गाठता आले नसते.

विमानतळावरील सेवेच्या दर्जामध्ये मुंबई आणि दिल्ली विमानतळ जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट असल्याचे गेल्या आठवडय़ात जाहीर झाले. सेवा आणि स्वच्छता याबाबत कायमच वेदनादायी अनुभव असलेल्या सर्वसामान्यांसाठी ही आश्चर्यमिश्रित कौतुकाची घटना असली तरी देशविदेशाच्या नियमित वाऱ्या करणाऱ्यांना यात फारसे नवल वाटणार नाही. याचे कारण म्हणजे गेल्या दशकभरात भारतीय विमानसेवेने टाकलेली कात या सर्वानीच अनुभवली आहे. २१ व्या शतकाच्या सुरुवातीपासून देशांतर्गत विमानसेवेचा चेहरामोहरा पार बदलला. केवळ उच्चभ्रूंसाठी असलेली ही सेवा लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस गाडय़ांच्या तिकीटदरांपर्यंत येऊन ठेपली. त्याच वेळी सेवेचा दर्जा वाढवण्यातही यश आले. चार वर्षांपूर्वी सुरू झालेले, मुंबईतील चकाचक टी २ टर्मिनल आणि तेथपर्यंत पोहोचण्याचा सहा पदरी उन्नत मार्ग हा तर या घोडदौडीतील मैलाचा दगड. याचेच प्रतिबिंब ‘एसीआय’च्या मानांकनावर पडले आहे.

विमानतळ आंतरराष्ट्रीय परिषद (एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनल) या संस्थेकडून जगभरातील १७६ देशांच्या १९५३ विमानतळांच्या सेवेचा वर्षभर आढावा घेतला जातो. विमानतळापर्यंत पोहोचण्याचे मार्ग, चेक-इन, सुरक्षा तपासणी, विश्रांतिगृह-उपाहारगृह- स्वच्छतागृह यांसारख्या सोयीसुविधा अशा ३४ कामगिरी निर्देशांकांबाबत प्रवाशांनी नोंदवलेल्या प्रतिसादानुसार विमानतळांना गुण दिले जातात. या निर्देशांकानुसार २०१६ मध्ये दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ व मुंबई येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळांना संयुक्तरीत्या दुसरा क्रमांक मिळाला होता. त्या वेळी दक्षिण कोरियाच्या सेऊल विमानतळाला पहिला क्रमांक होता. या वेळी चीनच्या बीजिंग आणि शांघाय पेलंग विमानतळांना मागे काढत दिल्ली व मुंबईने पहिला क्रमांक पटकावला आहे. वर्षभरात ४ कोटी प्रवाशांपेक्षा जास्त वर्दळ असलेल्या सर्वात गर्दीच्या विमानतळांमध्ये त्यांचा समावेश होतो. कमी प्रवासी हाताळणाऱ्या बंगलोर, चेन्नई (दीड ते अडीच कोटी प्रवासी), हैदराबाद, पुणे, कोलकाता आणि कोचीन (५० लाख ते दीड कोटी प्रवासी) तसेच लखनौ (२० ते ५० लाख प्रवासी) या विमानतळांनीही संबंधित विभागात प्रवासी सेवेमध्ये पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवले आहे.

या सगळ्यामागे भारतातील देशांतर्गत विमान वाहतुकीचा स्वनातीत वेगही कारणीभूत आहे. २००७-०८ ते २०१६-१७ या दहा वर्षांत दरवर्षी तब्बल दहा टक्के दराने प्रवासीसंख्या वाढली असून एप्रिल ते सप्टेंबर २०१७ दरम्यान भारतात सुमारे तीन कोटी आंतरराष्ट्रीय प्रवाशांची वर्दळ अनुभवली आहे. मुंबई व दिल्ली ही प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळे असल्याने यातील बहुतांश प्रवाशांची वाहतूक या दोन विमानतळांवरूनच होते. त्यातही मुंबईत केवळ एका धावपट्टीवरून विमानांची ये-जा होते. त्या बाबतीत जगातील सर्वाधिक विमानसंख्या हाताळणारे ते पहिल्या Rमांकाचे विमानतळ आहे. गेल्या चार महिन्यांत मुंबईने स्वत:चाच जागतिक विक्रम तीनदा मागे टाकला आहे. २६ नोव्हेंबर २०१७ रोजी मुंबईने २४ तासांत ९६९ विमानांची ये-जा पाहिली. ६ डिसेंबर रोजी ९७४ आणि २० जानेवारी रोजी ९८० विमानांनी मुंबईच्या धावपट्टीवर उतरण्याची-उडण्याची किमया साधली. या विमानतळाने एका तासात ५२ विमानांची वाहतूक हाताळली असून गर्दीच्या वेळी दर तासाला सुमारे ४८ विमाने उड्डाण करत – उतरत असतात. लंडनच्या गॅटविक, या दिवसाला ८७० विमानांची ये-जा हाताळणाऱ्या विमानतळाशीच त्याची तुलना होऊ शकते. मात्र लंडन शहरात चार विमानतळ आहेत.  गॅटविकच्या जोडीने हिथ्रो हे दोन धावपट्टय़ा असलेले विमानतळ आणि शिवाय स्टॅनस्टेड आणि ल्युटन ही विमानतळे आहेत. मुंबईसाठी मात्र कोणताही पर्याय नाही. जुहू धावपट्टीवरून विमानांची वाहतूक करता येत नाही. नवी मुंबई येथे विमानतळ बांधण्यासाठी २१ वर्षे वाट पाहावी लागली आहे. गेल्या महिन्यात या विमानतळाचे काम सुरू झाले असले तरी पहिला टप्पा पूर्ण होण्यासाठी २०२० उजाडणार आहे. त्या वेळी वर्षांला साधारण एक कोटी प्रवासीसंख्या या विमानतळाकडून हाताळता येईल. त्यानंतर आणखी तीन टप्प्यांत २०३१ मध्ये सहा कोटी प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी हे विमानतळ सक्षम होईल. तोपर्यंत वाढत जाणारी प्रवासीसंख्या हाताळण्याचा बोजा फक्त मुंबई विमानतळावर आहे. या विमानतळाची क्षमता ४ कोटींची असली तरी प्रत्यक्षात कितीतरी अधिक प्रवासीसंख्या हाताळावी लागत आहे. या परिस्थितीत मुंबई विमानतळ क्षमतेपक्षा जास्त प्रवासीसंख्या हाताळत आहे म्हणून कौतुक करण्यापेक्षाही राजकीय व प्रशासकीय थंडगार यंत्रणेला बोल लावणे अधिक उचित आहे. अक्षरश: लागोपाठोपाठ विमाने उतरवणाऱ्या वैमानिक व वाहतूक नियमन कर्मचाऱ्यांचे कौतुक करतानाच एवढय़ा प्रवाशांचे जीव धोक्यात घालणाऱ्या यंत्रणांचे अपयश नक्कीच लपवता येण्यासारखे नाही. प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक परिस्थितीचा हा निर्देशांक लक्षात घेतला असता तर मुंबईला पहिले स्थान गाठता आले नसते.

आणखी एक गोष्ट,  विमानतळावरील प्रवासी वाहतूक हाताळण्यात मुंबई विमानतळ अव्वल असले तरी देशांतर्गत वाढणारी प्रवासीसंख्या पाहता प्रभावी सार्वजनिक वाहतूक सेवेतून हे विमानतळ जोडले जाणे अत्यावश्यक आहे. दिल्लीमध्ये एअरपोर्ट मेट्रो हे याचे उत्तम उदाहरण आहे. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय या दोन्ही टर्मिनलला जोडल्याने वाहतूककोंडी व खर्च टाळून थेट विमानतळ गाठता येते. मुंबईत मात्र विमानतळाकडे जाण्यासाठी होणारा खर्च व लागणारा वेळ सर्वसामान्यांना परवडणारा नाही. विमान तिकिटांच्या जोडीने हा न टाळता येणारा खर्च का करावा? त्यातही दिल्लीवरून मुंबईत दोन तासांत आल्यावर विमानतळाबाहेर पडून ओला-उबर किंवा टॅक्सी-रिक्षा गाठण्यासाठीही साधारण दोन तास घालवावे लागतात. त्यामुळे काही वेळा विमानसेवेपेक्षा  रेल्वे वाहतूक अधिक श्रेयस्कर वाटू लागते. भविष्यात मुंबईत मेट्रो मार्ग विमानतळाला जोडला जाणार आहे, मात्र तो होईपर्यंत आणि झाल्यावरही पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करायला हरकत नाही. म्हणजे विमानतळ  प्रवाशांची ‘आहे मनोहर तरी..’मधून सुटका होईल.

प्राजक्ता कासले : prajakta.kasale@expressindia.com