सीकेपी बँकेतील ५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे. या याचिकेनुसार बँकेच्या संचालकांनी बेकायदा पद्धतीने कर्जवाटप केले आणि याच बेकायदा कर्जदारांनी कर्ज बुडविल्याने हा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
श्रीप्रकाश नील यांनी ही याचिका केली आहे. याचिकेतील दाव्यानुसार, सहकारी सोसायटीच्या निबंधकांकडे याबाबत २०१२ मध्ये तक्रार आल्यानंतर त्यांनी बँकेवर प्रशासकाची नियुक्ती केली होती. त्यानंतर एप्रिल २०१२-मार्च २०१३ या वर्षी करण्यात आलेल्या ऑडिटमध्ये या घोटाळ्याचा खुलासा झाला. बँकेच्या संचालक, महाव्यवस्थापक व अन्य अधिकारी यांनी कर्जदारांच्या साथीने कोटय़वधींचे कर्जवाटप केले. परिणामी ती बुडविण्यात आली. या प्रकरणी रिझव्र्ह बँक व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. परंतु घोटाळ्याच्या तक्रारीची दखलही घेतली नाही. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांची व अन्य आरोपींची खाती गोठविण्याची मागणी केली आहे.

विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआयकडे
मुंबई  : पुणे येथील सिम्बॉयसिस इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइनच्या विद्यार्थिनीच्या पार्टीनंतर झालेल्या गूढ मृत्यूचा पोलिसांनी केलेला तपास समाधानकारक नाही, असे स्पष्ट करीत उच्च न्यायालयाने सोमवारी तपासाची सूत्रे सीबीआयकडे वर्ग केली. सनम हसन (१८) असे या विद्यार्थिनीचे नाव असून मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी साजरी करीत असतानाच ती कोसळली होती. तिला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तिची आई नगिना हिने उच्च न्यायालयात हा मृत्यू अपघाती नसून तिची हत्या झाल्याचा आरोप केला. तसेच तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांच्या खंडपीठाने पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासाविषयी नाराजी व्यक्त करीत तपास सीबीआयकडे वर्ग केला.

ठाणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडले
ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेमार्फत मुख्यालय आणि तालुका पंचायत समित्यांमध्ये काम करणाऱ्या तृतीय व चर्तुथ श्रेणीतील सात ते आठ हजार कर्मचाऱ्यांचे ऐन सणासुदीत जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पगार रखडले असून वारंवार विनंती करूनही पगार मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आता कुटुंबासह आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. यापूर्वी तालुका स्तरावर वेतन दिले जायचे. मात्र, आता जिल्हा स्तरावरून विशिष्ट संगणक प्रणालीद्वारे वेतन देण्यात येते. त्या प्रणालीचा सराव नसल्यामुळे हा घोळ झाला असून तो निस्तरण्यात येईल, असे जिल्हा परिषदेच्यावतीने सांगण्यात आले.
कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेले असतानाही अधिकाऱ्यांनी मात्र स्वत:चे पगार काढून घेतल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे सचिव शरद भिडे यांनी केला आहे.

लाचखोर तलाठय़ास अटक
ठाणे : शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर भाडेपट्टीची नोंद करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना शहापूर तालुक्यातील खुटघरचे तलाठी प्रभाकर शिवराम चौधरी (४५) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी पकडले.