मुंबई : मुंबईत रविवारी ७०० नवीन रुग्णांची नोंद झाली तर १९ रुग्णांचा मृत्यू झाला. शनिवारी ३० हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या असून मुंबईतील  बाधितांचे प्रमाण २.३२ टक्के  आहे. रुग्णवाढीचा दर ०.१० टक्यांपर्यंत खाली आला आहे.

रविवारी ७०० नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ७ लाख १६ हजारांपुढे गेली आहे. एका दिवसात ७०४ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत ६ लाख ८३ हजारांहून अधिक  म्हणजेच ९५ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.  त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या चांगलीच घटली आहे. सध्या १५ हजार ७७३ उपचाराधीन रुग्ण आहेत.

शनिवारी ३० हजार १३७ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी २.३२  टक्के  नागरिक बाधित आढळले. आतापर्यंत ६६ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.  मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.१० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही ६५३ दिवसांवर पोहोचला आहे.

रविवारी १९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे करोना मृतांची एकू ण संख्या १५ हजार १८३ झाली आहे. १९ रुग्णांपैकी ११ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये १५ पुरुष व ४ महिला होत्या. २ रुग्णांचे वय ४० वर्षांखाली होते.  १० रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते. तर ७ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते.

ठाणे जिल्ह्यात ४०९ बाधित

ठाणे : जिल्ह्यात रविवारी ४०९ करोना रुग्ण आढळून आले. तर २६ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ४०९ करोनाबाधितांपैकी कल्याण—डोंबिवली ११०, ठाणे ८६, नवी मुंबई ६२, ठाणे ग्रामीण ६२, मिरा-भाईंदर ४३, अंबरनाथ १७, बदलापूर १४, उल्हासनगर नऊ  आणि भिवंडीत सहा रुग्ण आढळून आले. तर २६ मृतांपैकी अंबरनाथ १५, मिरा भाईंदर तीन, नवी मुंबई तीन, कल्याण—डोंबिवली दोन, ठाणे दोन आणि उल्हासनगरमध्ये एकाचा मृत्यू झाला.