दिवाळीच्या पहिल्या दिवशी आंघोळीला उठताना तुम्ही थंडीने कुडकुडल्याची आठवण साधारण किती वर्षांपूर्वीची आहे? पाच वष्रे, दहा वष्रे की पंधरा? साधारण आता चाळिशीत असलेल्यांना त्यांच्या लहानपणी दिवाळीत थंडी पडल्याचे आठवत असेल. कारण गेल्या किमान दहा वर्षांत तर दिवाळीच्या अभ्यंगस्नानाला उटणे लावताना अंग घामाने चिकचिकीत झाल्याचीच वेळ आली होती. या वेळीही परिस्थिती जैसे थे राहण्याची शक्यता अधिक.

या वेळी ऑक्टोबरच्या शेवटच्या तारखांना दिवाळी आली आहे. मात्र नोव्हेंबरमध्ये आलेल्या दिवाळीतही थंडी पडली नव्हती. मुंबईत अर्थातच उत्तरेप्रमाणे गारठवणारी थंडी पडण्याची अपेक्षा नाही. पण साधारण गुलाबी हवा ज्याला म्हणतो तेवढा गारवादेखील दिवाळीत नव्हता. हवामान केंद्रातील निदान मागच्या सात-आठ वर्षांतील किमान तापमानाचे आकडे तरी हेच सांगताहेत. किमान तापमान २० अंश से. खाली गेले की गारवा जाणवू लागतो. किमान तापमानाचा निकष यासाठी धरला जातो की दिवसातील सर्वात कमी तापमान हे सूर्योदयाच्या जरा आधी असते. त्यामागे शास्त्रीय कारणही आहे. पण ते आताच्या घडीला बाजूला ठेवू या. गेल्या काही वर्षांत हे किमान तापमान २३ ते २४ अंश से. दरम्यान राहते आहे. ज्या वर्षी पाऊस जास्त पडला किंवा दिवाळी नोव्हेंबरमध्ये आली तेव्हा हे तापमान २१ अंश से.पर्यंत खाली उतरले. मात्र कोणत्याही वर्षी ते २० अंश से. खाली गेले नाही.

हवामानात बदल होणे अनिवार्य आहे. थंडी, उन्हाळा, पाऊस या ऋतुचक्रामध्ये बदल होत असतात आणि ते नैसर्गिकही आहे. पण हे बदल होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. गेल्या शंभर वर्षांत मुंबईच्या कमाल तापमानात १.५ अंश से.ने बदल झाला, असे मुंबई हवामानशास्त्र विभागाने केलेल्या अभ्यासात दिसून आले होते. मात्र दिवाळीतील तापमानाचा हा बदल तर अवघा १५-२० वर्षांतील आहे आणि आपल्यापकी बहुतेकांनी तो अनुभवला आहे. मग यामागे नक्की काय कारण असावे? जागतिक तापमानवाढ? सध्या हवामानातील कोणत्याही लहान-मोठय़ा बदलामागे हे कारण हमखास दिले जाते. कदाचित ते लागूही पडत असेल. मात्र आपल्या दिवाळीतील तापमानवाढीसाठी स्थानिक तापमानवाढही कारणीभूत असू शकते.

हवामानशास्त्र विभागासोबतच पर्यावरणाशी संबंधित काम करणाऱ्या संस्था, भूगोल अभ्यासक, आयआयटीसारख्या संस्था यांनी याबाबत वेगवेगळे निकष व परिमाण वापरून केलेल्या अभ्यास व संशोधनावरून स्थानिक तापमानवाढीचा मुद्दा लक्षात घेता येईल. खरे तर किनारपट्टीवर असल्याने मुंबईच्या तापमानावर समुद्राचा मोठा प्रभाव पडतो. मात्र तसे असूनही कोकण किनारपट्टीवरील इतर गाव किंवा शहरांपेक्षाही मुंबईतील तापमान जास्त वाढते. विशेषत: रात्रीच्या वेळी हा फरक अधिक असतो, असे अभ्यासात दिसून आले आहे. पुणे वेधशाळेने केलेल्या अभ्यासात मुंबईतीलच कुलाबा व सांताक्रूझ या दोन तुलनेने जवळ असलेल्या ठिकाणांमधील दिवसा व रात्रीच्या तापमानातील फरकही लक्ष वेधून घेणारा आहे. १९७१ ते २००९ या तीस वर्षांतील किमान तापमानाचा अभ्यास केल्यावर या दोन्ही ठिकाणच्या सूर्यास्ताच्या वेळच्या तापमानात ०.५ अंश से. चा फरक होता. रात्री हा फरक ३ अंश से. हून अधिक झाला. दहा वर्षांच्या तीन टप्प्यांत २००१ ते २००९ या नऊ वर्षांत सांताक्रूझ येथील ३ अंश से. हून जास्त तापमान असलेल्या रात्रींची संख्या आधीच्या वर्षांच्या तुलनेत जास्त होती. गेल्या २० वर्षांत मुंबईतील औद्योगिक वाढ, प्रकाश परावर्तित करणाऱ्या काचेच्या इमारती, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, लाद्यांनी झाकलेली माती, वाहनातून बाहेर पडणारा गरम धूर, वातानुकूलित यंत्र हे सर्व व त्यांची वाढणारी संख्या सगळ्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे म्हणता येईल. कारण आताही मुंबईतील उपनगरातील तापमानाचा विचार केला तर अंधेरी व वांद्रे-कुर्ला संकुल या सर्वाधिक औद्योगिक विकास झालेल्या पट्टय़ात तापमान जास्त असल्याचे हवामानशास्त्र केंद्राच्या अभ्यासात दिसले आहे. दिल्ली व मुंबईसारख्या महानगरात तापमानवाढीचा वेग अधिक असल्याचे दिल्ली आयआयटी, नासा तसेच द इंजिनीअिरग अ‍ॅण्ड रिसोर्स इन्स्टिटय़ूट (टेरी) यांच्या अभ्यासातही दिसून आले आहे. सरासरी तापमानात बदल झाला असतानाच रात्रीच्या तापमानातील फरक हा अधिक असल्याचा निष्कर्ष समोर आला. ही शास्त्रीय कारणमीमांसा किंवा आकडेवारी बाजूला ठेवली तरी आपला अनुभवही काही वेगळे सांगत नाही. मुंबईपासून पन्नास किलोमीटर दूर गेल्यावर आजही दिवाळीत गारवा जाणवतो. मुंबईला लगटून असलेल्या ठाणे, पालघरच्या ग्रामीण भागात हा फरक जाणवतो, एवढेच काय थेट मुंबईत असलेल्या पण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनीच्या परिसरात राहणाऱ्यांच्या घरीही दिवाळीत गारवा असतो. फक्त आपल्या घरांमधून तो गायब झाला आहे.

प्राजक्ता कासले – prajakta.kasale@expressindia.com