– संदीप आचार्य

मुंबईत काल रविवारपर्यंत करोनामुळे १,३९५ रुग्णांचे मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती महापालिका व राज्याचा आरोग्य विभाग सांगत असला तरी यात करोनाची लागण असलेल्या ४५१ रुग्णांची माहिती ‘करोना मृत्यू’ म्हणून नोंदविण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याशिवाय पालिकेच्या ‘डेथ ऑडिट कमिटी’पुढे गेल्या आठवड्यापर्यंत सादर न झालेल्या सुमारे ५०० प्रकरणांचा विचार केल्यास मुंबईतील सुमारे ९५० मृत्यू हे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची भीती पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईत करोनाचे रुग्ण सापडू लागल्यावर सुरुवातीला बहुतेक रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले जात होते. त्यावेळी चाचण्या करण्याची यंत्रणा प्रामुख्याने कस्तुरबा व केईएम रुग्णालयात होती. हळूहळू मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली व मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले. यातूनच हे मृत्यू करोनाचे दाखवायचे की नाही, हा संभ्रम पालिका प्रशासनापुढे निर्माण झाला. आज मुंबईत करोनाचे एकूण रुग्ण ५८,२२६ आहेत तर करोना मृतांची संख्या १,३९५ आहे. राज्यात करोना रुग्ण १,०७,९५८ आहेत तर मृत्यूंची नोंद ३,३९० दाखवण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेने त्यांच्या रुग्णालयातील ४५१ करोना रुग्णांची नोंद ‘करोना मृत्यू ‘ दाखवली नसल्याचा मुद्दा आता आरोग्य विभागाने उपस्थित केला आहे. यातून हे मृत्यू का दडविण्यात आले असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरोग्य विभाग व मुंबई महापालिका यांच्या मध्ये या ४५१ करोना मृत्यूंवरून शीतयुद्ध निर्माण झाले असून साधारण एप्रिलच्या सुरुवातीपासूनचे हे मृत्यू असल्याचे पालिकेच्या एका ज्येष्ठ डॉक्टरने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

याच डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तसेच पालिकेतील ‘डेथ ऑडिट कमिटी’तील काही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ‘आयसीएमआर’ व ‘जागतिक आरोग्य संघटना’ या दोघांनीही करोना मृत्यू कशास म्हणावे याची सुस्पष्ट व्याख्या केली आहे. ‘आयसीएमआर’च्या याबाबतच्या नियमावलीतील ७.१ मध्ये अपमृत्यू, अपघात मृत्यू व आत्महत्या वगळता सर्व मृत्यू हे करोना मृत्यू म्हणून घोषित करणे बंधनकारक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही अशीच सुस्पष्ट व्याख्या केली असताना मुंबई महापालिकेने तब्बल ४५१ मृत्यू हे करोना मृत्यू म्हणून दाखवलेले तर नाहीच शिवाय हे मृत्यू करोनाचे नाहीत, असे आरोग्य विभागाला ८ जून रोजी एका मेलद्वारे कळवून वादाला उघड तोंड फोडले आहे.

महापालिकेने ८ जून रोजी आरोग्य विभागाला पाठवलेल्या मेलबरोबर सर्व मृतांची नावे असून यातील २० मृत्यू पावलेल्यांची नावे दुबार आली आहेत तर तिघांचे मृत्यू हे अपमृत्यू असल्याने हे २३ मृत्यू वगळता सर्व मृत्यू हे करोनाचे मृत्यू असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. पालिकेने पाठवलेल्या इ-मेलची प्रत लोकसत्ताकडे उपलब्ध आहे. नियमानुसार प्रत्येक करोना रुग्णाची नोंद ही आयसीएमआरच्या पोर्टलवर करावी लागते. त्यानुसार पालिकेने आरोग्य विभागाला पाठवलेल्या यादीतील बहुतेक सर्व मृतांची नोंद आयसीएमआरच्या पोर्टलवर आहेच शिवाय पालिकेच्या विविध रुग्णालयात दाखल झालेल्या या सर्व मृत रुग्णांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तशा नोंदी रुग्णालयातील केसपेपरवर संबंधित डॉक्टरांनी नोंदवलेल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. या रुग्णांचे मृत्यू झाल्यानंतर सर्व मृत्यूंची नोंद ही स्वतंत्र फॉर्मद्वारे पालिका मध्यवर्ती केंद्राकडे करावी लागते तसेच मृत्यूपर्यंतचे सर्व केस पेपरवर सादर करावे लागतात. यानंतर महापालिकेच्या “डेथ ऑडिट कमिटी”कडे या मृत्यूंचे नेमके विश्लेषण व कारणमीमांसा करण्यासाठी ही सर्व प्रकरणे सादर केले जातात. विद्यमान पालिका ‘डेथ ऑडिट समितीत’ सात सदस्य असून ४५१ मृत्यूंच्या प्रकरणात रुग्णाला करोना असल्याचे चाचणीत दिसून आल्यानंतरही मृत्यूचे कारण ‘करोना मृत्यू नाही’ असे नोंदवल्याचे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत पालिका रुग्णालयांच्या काही डिन तसेच मृत्यू विश्लेषण समितीतील सदस्यांशी विचारणा केली असता त्यांनी काहीही बोलायला नकार दिला तसेच आमची नावे कृपया घेऊ नका अशी विनंती त्यांनी केली.
पालिका रुग्णालयात दाखल झालेल्या व करोना चाचणी पॉझिटिव्ह येऊनही रुग्ण कॅन्सरचा होता, मधुमेहाचा होता अथवा ह्रदयविकाराचा होता व त्यामुळे मृत्यू झाला आणि हे करोनाचे मृत्यू नाहीत असा पालिकेचा दावा आहे. यामागे मुंबईत मोठ्या प्रमाणात होत असलेले मृत्यू दडपणे हाच एकमेव उद्देश असल्याचा दावा पालिकेतील एका प्राध्यापक डॉक्टरांनी केला आहे. या ४५१ मृत्यू शिवाय जवळपास ५०० मृत्यूंचे डेथ ऑडिट गेल्या आठवड्यापर्यंत झाले नव्हते. मात्र या मृत्यूंच्या कालावधीची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. हे सर्व मृत्यू करोनाचेच असल्याचे आयसीएमआर व जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांचा विचार करता सुस्पष्ट आहे.

एकीकडे करोना रुग्ण अशी नोंद असलेल्या रुग्णाचा मृत्यू हा ‘करोना मृत्यू नाही’ अशी नोंद पालिकेने आरोग्य विभागाला पाठवली असून आरोग्य विभाग नियमावर बोट ठेवून करोना मृत्यू का नाही, अशी विचारणा करत आहे. याबाबत महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांना तसेच अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) सुरेश काकाणी तसेच सहआयुक्त आशुतोष सलील यांना व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून नेमके प्रश्न विचारून पालिकेची भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली तसेच दूरध्वनीही केले. मात्र आयुक्त चहेल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी व आशुतोष सलील यांनी या ४५१ करोना मृत्यूवर काहीही मत व्यक्त केले नाही.

एवढंच नव्हे तर पालिकेने आरोग्य विभागाला मेल पाठवलेला नाही वा हे करोना मृत्यू नाहीच किंवा असे काहीही नाही असेही उत्तर दिलेले नाही. आज सोमवारी सकाळीही आयुक्त चहेल व सुरेश काकाणी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास तसेच आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांच्याशी वारंवार संपर्क साधून या ४५१ मृत्यूंबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली मात्र त्यांनीही प्रतिसाद दिला नाही व घटना नाकारलीही नाही.

‘करोना मृत्यू’ जाहीर करण्याचे आयसीएमआरचे स्पष्ट नियम असताना ४५१ मृत्यू करोना मृत्यू नाहीत हे कसे व कोणत्या नियमाखाली पालिका म्हणू शकते? हे करोना मृत्यूच आहेत हे स्पष्ट झाले तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? शेकडो करोना मृत्यूंचे वेळेत डेथ ऑडिट न होणे व पेपर समितीपुढे न जाण्याची कारणे काय हे प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र पालिका व आरोग्य खात्यातील सारेच उच्चपदस्थ ‘हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून’ असल्याने आजतरी हे प्रश्न अनुत्तरित आहेत. मात्र आयसीएमआरच्या पोर्टलवर ज्या रुग्णाची नोंद महापालिका करोना पॉझिटिव्ह दाखवते त्याच रुग्णाच्या मृत्यूच्या नोंदीचे कारण अन्य असूच शकत नाही, असे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर पालिका रुग्णालयातील एका माजी व एका विद्यमान अधिष्ठात्यांनी सांगितले. हे मृत्यू जर करोना मृत्यू म्हणून जाहीर केले तर सध्याचा मुंबईचा ३.४ टक्के हा मृत्यूदर वाढून ५ टक्क्यांपर्यंत जाईल, अशी भीतीही या अधिष्ठात्यांनी व्यक्त केली.