राजधानी दिल्ली करोना संकटानं पुन्हा एकदा जेरीस आल्याचं दिसत आहे. दिल्लीत दररोज पाच ते आठ हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत असून, मुंबईत करोना पुन्हा एकदा डोकं वर काढण्याची शक्यता आहे. गेल्या चार दिवसांतील आकडेवारीनं ही भीती अधिक गडद होताना दिसत आहे. मागील दोन दिवसात मुंबईत एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत.

दिल्लीत करोना लाटेचा उद्रेक झाल्यानंतर मुंबईत परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दिवाळीनंतर मुंबईत आणि महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. मागील काही दिवसांपासून समोर येत असलेल्या करोना रुग्णांच्या संख्येनं ही भीती गडद होताना दिसत आहे.

मुंबईत दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील चार दिवसांतच मुंबईत दिवसाला आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या ८७१ वरून १ हजार ९२ वर म्हणजे जवळपास ११०० च्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. मुंबईत १८ नोव्हेबर रोजी ८७१ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १९ नोव्हेबर रोजी यात काहीशी वाढ झाली. रुग्णसंख्या ९२४ रुग्ण आढळून आले. २० नोव्हेबरला रुग्णसंख्या हजारांच्या पलिकडे गेली. मुंबईत १०३१ रुग्ण आढळून आले. तर २१ नोव्हेबर रोजी १०९२ रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबईसाठी पुढील चार आठवडे महत्त्वाचे

“मुंबईसाठी पुढील तीन ते चार आठवडे खूप महत्त्वाचे आहेत. मात्र, मुंबईत कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात येणार नाही. तीन ते चार आठवड्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. जलतरण तलाव (स्वीमिंग पूल), शाळा आणि रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आलं होतं. मात्र, आता या तिन्ही गोष्टी बंद राहतील. इतर ठिकाणावर सध्या कोणताही परिणाम होणार नाही,” अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी एका मुलाखतीत बोलताना दिली होती.