मुंबईत पावसामुळे लाईफलाईन कोलमडली आहे, अर्थात तिन्ही मार्गावरची वाहतूक धीम्या गतीने होते आहे. वेगवान मुंबईचा वेग मंदावला आहे.अशात मुंबईकरांच्या जीवाशी रेल्वेने कसा खेळ केला याचे उदाहरण समोर आले आहे. हार्बर रेल्वे मार्गाजवळ तुटलेल्या रुळाला फडके बांधून त्यावरून लोकल चालवण्याचा फ्रकार रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केल्याचे समोर आले आहे. एबीपी माझाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

हार्बर रेल्वे मार्गावर मानखुर्द ते गोवंडी दरम्यान रेल्वे रूळाला तडा गेला आणि रुळाचा तुकडा पडला. या तड्यांवर उपाय योजण्याऐवजी अधिकाऱ्यांनी तुटलेल्या रुळाला फडके बांधून तात्पुरती मलमपट्टी करत मुंबईकरांच्या जीवाशी खेळ केल्याचे समोर आले आहे. अशा फडके बांधलेल्या रूळावरून लोकलही धावली, त्यामुळे रेल्वे सेवा सुरू ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून शेकडो मुंबईकरांचा जीव कसा धोक्यात घातला गेला हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. लोकलचा वेग, लोकलचे वजन, रूळावर पडणारा ताण या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर हे फडके किती काळ तग धरू शकणार? हा प्रश्न आहेच. अशातच अशा फडके बांधलेल्या रुळावरून लोकल कशी काय चालवली हा प्रश्नही अद्याप अनुत्तरीतच आहे.

काही वेळापूर्वीच मुंबई हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला धारेवर धरत मुंबईतली लाईफलाईन कशी काय कोलमडते? असा प्रश्न विचारत झापले आहे तसेच रेल्वे प्रशासनाने रुळांवर साठणाऱ्या पाण्याबाबत कोणतीही उपाययोजना केली नसल्याचेही निरीक्षण कोर्टाने नोंदवले. रेल्वे रूळांवर पाणी साठते तर मग ट्रॅकची उंची का इतक्या वर्षात का वाढवण्यात आली नाही असाही प्रश्न कोर्टाने उपस्थित केला. या सगळ्यात आता हार्बर मार्गावर तुटलेल्या रुळाला फडके बांधून लोकल चालवल्याचा प्रकार केल्याचे समोर आले आहे.