मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचे आज करोनामुळे निधन झाले. सुनील कदम असे त्यांचे नाव होते. त्यांच्या आठवणीत महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक कविताही पोस्ट केली आहे. गेल्या सात दिवसांपासून सुनील कदम यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. News 18 लोकमतने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

एप्रिल महिन्यात महापौर किशोरी पेडणेकर याही होम क्वारंटाइन झाल्या होत्या. मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना करोना झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर किशोरी पेडणेकर या १४ दिवस होम क्वारंटाइन झाल्या होत्या. त्यांच्या मोठ्या भावाला म्हणजेच सुनील कदम यांनाही करोनाची लागण झाली होती. मागील सात दिवसांपासून नायर रुग्णालयात सुनील कदम यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र अखेर शनिवारी सकाळी सुनील कदम यांची प्राणज्योत मालवली.

राज्यात काल समोर आलेल्या नोंदींप्रमाणे १० हजार ३२० नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर २६५ जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या दीड लाख रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. तर कोविड योद्धे असं संबोधलं जाणाऱ्या पोलिसांनाही करोनाची बाधा झाली आहे. शनिवारी आलेल्या अहवालानुसार २३२ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत ९ हजार ४४९ पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे. तर आत्तापर्यंत १०३ पोलिसांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे.