महाराष्ट्रात करोनाची वाढती रुग्णसंख्या पाहाता राज्य सरकारने १३ एप्रिल रोजी राज्यात निर्बंध लादले. २२ एप्रिलपासून त्यामध्ये अजून काही कठोर निर्बंधांचा समावेस केला. यामध्ये प्रामुख्याने संचारबंदी आणि आंतरजिल्हा तसेच राज्याबाहेर प्रवास करण्यासाठी ई-पासची सक्ती अशा नियमांचा समावेश करण्यात आला आहे. याच नियमावलीचा एक भाग म्हणून अवघ्या आठवड्याभरापूर्वी करोना संचारबंदीच्या काळातही शहरात आवश्यक कामांसाठी फिरणाऱ्या वाहनांसाठी तीन रंगांच्या स्टिकर्सचा नियम लागू केला होता. यामध्ये तुम्ही काम करत असलेल्या क्षेत्रानुसार तुमच्या गाडीला लाल, हिरवा आणि पिवळा यापैकी एका रंगाचा स्टिकर लावण्यात येत होता. तो निर्णय अवघ्या आठवड्याभरात मुंबई पोलिसांनी रद्द केला आहे. तसं ट्विट पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवरून केलं आहे.

काय होता हा नियम?

राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांनुसार अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्ती किंवा कर्मचाऱ्यांनाच संचारबंदीच्या काळात बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार, डॉक्टर, मेडिकल कर्मचारी, रुग्णवाहिका आणि इतर वैद्यकीय उपकरणं पुरवणाऱ्या वाहनांना लाल रंगाचे स्टिकर्स देण्यात आले होते. अन्नपदार्थ, भाजीपाला, फळे, किराणा आणि डेअरीच्या उत्पादनांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना हिरव्या रंगाचं स्टिकर देण्यात आलं होतं. विशेष म्हणजे पोलिसांनी लाल रंगाच्या स्टिकर्सच्या गाड्यांसाठी ग्रीन कॉरिडॉर देखील तयार केला होता.

 

पोलीस म्हणतात, प्रिय मुंबईकरांनो…!

दरम्यान, स्टिकर्सचा नियम जरी रद्द करण्यात आला असला, तरी रस्त्यावर पोलिसांकडून होणारी तपासणी मात्र सुरूच राहणार असल्याचं या ट्विटमध्ये पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी नागरिकांना सहकार्याचं आवाहन केलं आहे. “प्रिय मुंबईकरांनो… लाल, पिवळा, हिरवा रंगानुसार वाहनांचं वर्गीकरण आता बंद केलं जात आहे. मात्र, संपूर्ण तपासणी सुरू ठेवली जाईल. आम्ही आशा करतो की आपण करोनाशी लढण्यामध्ये आमच्या पाठिशी उभे राहाल आणि घराबाहेरची सर्व अनावश्यक किंवा विना-आपात्कालीन हालचाल टाळाल”, असं या ट्विटमध्ये आवाहन करण्यात आलं आहे.

समजून घ्या : दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्यासाठी कसा मिळवाल ई-पास!

दरम्यान, हा नियम जरी रद्द करण्यात आला असला, तरी आंतरजिल्हा किंवा दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी आता महाराष्ट्र पोलिसांनी ई-पास सक्तीचा करण्यात आला आहे. यासाठी ई-पासच्या संकेतस्थळावर किंवा नजीकच्या पोलीस स्थानकात जाऊन परवानगी असलेल्या कारणांसाठीच पास मिळू शकणार आहे.