वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांचा नवा प्रयोग

मुंबई : सिग्नल लाल असताना हॉर्न वाजवण्याचा मोह, सवय किंवा उतावीळपणा आता वाहनचालकांना सोडून द्यावा लागणार आहे. तसे न केल्यास त्या हॉर्नहौसेला मोठय़ा खोळंब्याची शिक्षा मिळणार आहे. ध्वनीप्रदूषण रोखण्यासह वाहनचालकांच्या बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी मुंबई पोलीस एक प्रयोग राबविणार आहेत. त्याद्वारे हॉर्नच्या आवाजाने ८५ डेसीबलची पातळी ओलांडल्यास सिग्नल हिरवा होण्याऐवजी लालच राहील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक पोलीस दलाचे सहआयुक्त मधुकर पांडे यांनी या माहितीला दुजोरा दिला.

सिग्नल लाल असूनही अनेक वाहनचालक विनाकारण हॉर्न वाजवून पुढे थांबलेल्या वाहनांना इशारा करतात. सिग्नल किती सेकंदात रंग बदलेल याची सूचना वाहन चालकांना देणारी यंत्रणा मुंबईत बहुतांश ठिकाणी आहे. सिग्नलसोबत जोडलेल्या इंडीकेटरवरील कमी होत जाणारे सेकंद चालकांना किती वेळ थांबावे, पुढे जाण्यासाठी किती वेळ आहे, याची माहिती देतात. मात्र तेथेही हॉर्नच्या आवाजाचा कलकलाट असतो.  वाहतूक पोलिसांनी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मरिन ड्राईव्ह, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील चौकांमध्ये १० मिनिटांसाठी आवाजाची पातळी मोजणारी यंत्रणा उभी केली. तेव्हा सिग्नलवरील आवाजाची पातळी ८५ डेसीबलची मर्यादा ओलांडते हे स्पष्ट झाले. याच प्रयोगांमध्ये आवाजाची पातळी ८५ डेसीबलपुढे गेल्यास सिग्नल हिरवा होण्याऐवजी पुन्हा दिड मिनिटांसाठी लाल ठेवण्यात आला. सकाळच्या घाईच्या वेळेत दिड मिनिट खोळंबा झाल्याने चालक आणि प्रवासी प्रचंड अस्वस्थ झाल्याचे पोलिसांनी पाहिले.

बेशिस्त चालकांना वठणीवर आणण्यासाठी किंवा हॉर्नमुळे पादचारी-रहिवाशांना किती त्रास होतो याची जाणीव करून देण्यासाठी अशा प्रकारची शिक्षा करावी, असे वाहतूक पोलिसांनी ठरवले आहे. त्यासाठी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये प्रयोग करण्यात आले. प्रयोग करताना सिग्नलवर जे चित्र होते ते कॅमेऱ्यात टिपले गेले. शुक्रवारी या चित्रणाच्याआधारे तयार केलेली ध्वनीचित्रफीत मुंबई पोलिसांनी ट्वीटरद्वारे सर्वदूर प्रसारित केली. ती मुंबईसह आसपासच्या महानगरांमध्ये चर्चेचा विषय ठरली.

थेट कारवाई सुरू करण्याऐवजी जनजागृती करावी या उद्देशाने ही चित्रफीत समाजमाध्यमांवरून प्रसारित करण्यात आल्याचे सहआयुक्त पांडे यांनी स्पष्ट केले. नागरिकांचा प्रतिसाद, प्रतिक्रिया लक्षात घेऊन प्रयोग सुरू करण्यात येणार आहे. त्याबरोबरच या कारवाईमुळे वाहतुकीचा खोळंबा, त्याचे परिणाम आदी बाबींचाही अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर पुढल्या काही दिवसांत शहरातील एका चौकातल्या सिग्नलवर आवाजाची पातळी मोजणारे यंत्र बसवले जाईल. आवाजाने ८५ डेसीबलची मर्यादा ओलांडली की सिग्नल आणखी काही काळासाठी लाल राहिल, अशी स्वयंचलीत यंत्रणा उभारली जाईल. सिग्नल किती सेकंदांसाठी लाल राहिल किंवा बेशिस्त चालकांचा आणखी किती सेकंद खोळंबा करायचा हेही ठरवले जाईल. एका चौकात हा प्रयोग राबविल्यानंतर अन्य चौकात तशी व्यवस्था केली जाईल. हळूहळू सर्व मुंबईत ही व्यवस्था केली जाईल, असे पांडे यांनी स्पष्ट केले.

बहुतांश वाहने वातानुकुलीत असल्याने आपल्याच हॉर्नचा किती त्रास होतो याची जाणीव चालक, प्रवाशांना होत नाही. मात्र पादचारी, आसपासची वस्ती, रुग्णालये, शाळांना या कलकलाटाचा प्रचंड त्रास होतो, अशी प्रतिक्रिया वाहतूक पोलीस व्यक्त करतात.

प्रयोग काय?

सिग्नल लाल असताना वाहनचालकाने हॉर्न वाजवला आणि त्याच्या आवाजाच्या पातळीने ८५ डेसीबलची पातळी ओलांडली तर सिग्नल आणखी काही मिनिटे लाल राहील. सिग्नल लाल राहिल्याने त्याच्यासह अन्य वाहनचालकांचा आणखी खोळंबा होईल. हा खोळंबा हीच बेशिस्त चालकांसाठी शिक्षा असेल. हा प्रयोग करण्यापूर्वी त्याबद्दल वाहनचालकांमध्ये जागृती करण्यात येईल. हॉर्नचा त्रास पादचारी, आसपासची वसाहत, रुग्णालये आणि शाळांना किती आणि कसा होतो, याची जाणीव वाहनचालकांना या प्रयोगातून व्हावी, अशी अपेक्षा आहे.

सकारात्मक प्रतिसाद,

स्वागतही : या ध्वनिचित्रफितीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आवाज फाऊंडेशनच्या सुमेरा अब्दुल अली यांनी स्वागत केले आहे. हा उपक्रम कायमस्वरुपी करणे आवश्यक आहे. हॉर्नसोबत सीटबेल्ट बंधनकारक करण्यासाठीही अभियान सुरू करायला हवे. या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्वीटद्वारे व्यक्त केली.