मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून मुंबईकरांचं मन जिंकलं आहे. कॅन्सरग्रस्त सात वर्षीय मुलाची इच्छा पूर्ण करत मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्यातील माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. अर्पित मंडल या सात वर्षीय मुलाला कॅन्सर झाला असून, आपण पोलीस निरीक्षक व्हावं अशी त्याची इच्छा होती. मुलुंड पोलिसांनी अर्पितची इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने त्याला एका दिवसासाठी खाकी वर्दी देत पोलीस निरीक्षक बनवलं.

मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया टीमने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अर्पितचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी अर्पितच्या इच्छाशक्तीचंही कौतुक केलं आहे. फोटोंमध्ये पोलीस कर्मचारी अर्पितला केक भरवताना दिसत आहेत. यावेळी अर्पित खाकी वर्दीत खुर्चीवर बसलेला दिसत आहे.

‘सात वर्षीय अर्पितच्या स्पिरीटने मुलुंड पोलिसांचं मन जिंकलं. आम्हाला शक्य झालं तर फक्त त्याची पोलीस होण्याची नाही तर सगळ्या इच्छा पुर्ण करु’, अशी कॅप्शन फोटोला देण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या या कृतीने ट्विटरवर भारावले असून कौतुकाचा वर्षाव करत आहेत. मुंबई पोलिसांनी अशाप्रकारची कौतुकास्पद कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी साकीनाका पोलिसांनी तक्रार करण्यासाठी आलेल्या तरुणाचा वाढदिवस असल्याचं कळल्यानंतर त्याचा वाढदिवस साजरा केला होता.