उपनगरी गाडय़ांच्या सुलभ वाहतुकीसाठी दिवा-डोंबिवलीदरम्यान महत्त्वाचे काम

दिवा स्थानकातील जलद गाडय़ांच्या थांब्यासाठी चालू असलेल्या नऊ-दहा तासांच्या महा-मेगाब्लॉकमुळे हैराण झाले असाल, तर थांबा! अशा प्रकारच्या आणखी दहा महा-मेगाब्लॉकला सामोरे जाण्याची तयारी प्रवाशांना करावी लागणार आहे.

दिवा स्थानकातील मुंबईच्या टोकाकडील कामे पार पाडल्यानंतर रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) दिवा स्थानकाच्या कल्याणच्या टोकाकडील रुळांच्या रचनेत बदल करणार आहे. येथील रुळांची रचना खूपच क्लिष्ट असल्याने ती बदलण्यासाठी नऊ-दहा तासांच्या किमान आठ ते दहा ब्लॉकची गरज पडणार आहे.

ठाणे-दिवा यादरम्यानच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून दिवा येथेही जलद गाडय़ांना थांबा देण्यासाठी मध्य रेल्वे व एमआरव्हीसी मोठी कामे करत आहे. या कामांमधील शेवटचा महा-मेगाब्लॉक २३ ऑक्टोबर रोजी नियोजित केला आहे. हा ब्लॉक पूर्ण झाल्यानंतर दिवाळीपासून दिवा स्थानकात जलद गाडय़ांना थांबा देण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे.

हे काम झाल्यानंतर दिवा स्थानकाच्या कल्याणच्या टोकाकडील महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत, असे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले.

कामे करण्यास कारण की..

  • दिवा ते कल्याण यादरम्यान सध्या असलेल्या पाचव्या-सहाव्या मार्गिका मुख्यत्वे मालगाडय़ांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जातात. या मार्गिकांदरम्यान अनेक क्रॉसओव्हर असल्याने तेथे लांब पल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूक मोठय़ा प्रमाणात करणे अशक्य आहे. ल्ल सध्याच्या तिसऱ्या-चौथ्या मार्गिकांमध्येही अनेक क्रॉसओव्हर आहेत. ही संख्या दहा ते बारा आहे.
  • भविष्यात जास्त सेवा चालवण्यासाठी तसेच लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या सुलभ वाहतुकीसाठी हे क्रॉसओव्हर किंवा रुळ दुभाजक काढून टाकावे लागणार आहेत.
  • येथे काही सेक्शनमध्ये सध्या २० ते ३० किमी प्रतितास एवढी वेगमर्यादा लावण्यात आली आहे. ही वेगमर्यादा काढून टाकण्यासाठी ही महत्त्वाची कामे पूर्ण होणे आवश्यक आहे.
  • ही कामे करण्यासाठी किमान आठ ते कमाल दहा महा-मेगाब्लॉक घेण्याची गरज आहे. त्यातील प्रत्येक ब्लॉक नऊ ते दहा तासांचा असेल, असेही या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.