परळ, एल्फिन्स्टन स्थानकातील पुलाच्या कामांसाठी आजपासून ब्लॉक

लष्कराकडून उभारल्या जाणाऱ्या परेल आणि एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलाच्या कामांसाठी पश्चिम रेल्वेकडून २६ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. तर मध्य रेल्वेकडून २७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ब्लॉक घेऊन कामे केली जातील. त्यासाठी काही लोकल फेऱ्या रद्द करतानाच काही फेऱ्या अंशत: रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यामुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांना त्याची झळ बसू शकते. पश्चिम रेल्वेवर २६ जानेवारी रोजी मध्यरात्री १२ ते सकाळी पाच आणि त्याचबरोबरच २७ आणि २८ जानेवारीच्या मध्यरात्रीही होणारा ब्लॉक मध्यरात्री दीड ते सकाळी साडेचार वाजेपर्यंत असेल. एल्फिन्स्टन स्थानकाजवळ चारही मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर २७ जानेवारीच्या मध्यरात्री डाऊन धीम्या मार्गावर मध्यरात्री १२.५० ते सकाळी ६.२० आणि अप धिम्या मार्गावर मध्यरात्री दीड ते सकाळी साडेचार वाजेपर्यंत ब्लॉकदरम्यान काम चालेल. त्यामुळे धिम्या मार्गावरील लोकल गाडय़ा जलद मार्गावर वळविण्यात येतील. चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकात लोकल गाडय़ांना थांबा मात्र देण्यात आलेला नाही.

डाऊन मार्गावरील अंशत रद्द होणाऱ्या फेऱ्या

भाईंदर लोकल रा. ११.४० वा. चर्चगेट आणि वांद्रे, नालासोपारा लोकल रा. ११.४४ वा. चर्चगेट आणि वांद्रे, विरार लोकल रा. ११.५८ वा. चर्चगेट आणि वांद्रे, विरार लोकल रा. १२.२० वा. चर्चगेट आणि वांद्रे, विरार लोकल रा. १२.५०  वा. चर्चगेट आणि वांद्रे.

२७ जानेवारीच्या मध्यरात्री लोकल गाडय़ांचे नियोजन

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कसारा प. ४.१५ वा., सीएसएमटी ते खोपोली प.४.२४ वा., सीएसएमटी ते कर्जत प. ४.४८ वा., सीएसएमटी ते कसारा प.५ वा., सीएसएमटी ते आसनगाव प.५.१२ वा., सीएसएमटी ते कर्जत प. ५.२० वा, सीएसएमटी ते टिटवाळा प. ५.२८ वा., सीएसएमटी ते अंबरनाथ प.५.४० वा, सीएसएमटी ते टिटवाळा प. ५.५२ वा., सीएसएमटी ते आसनगाव स. ६ वा या डाऊन धिम्या मार्गावरील लोकल गाडय़ा डाऊन जलदवरून चालवल्या जातील.

  • पश्चिम रेल्वेवर २६ जानेवारी रोजी होणाऱ्या ब्लॉकमुळे चर्चगेट स्थानकातून सुटणारी रात्री ११.५२ वा, मध्यरात्री १२.०१ आणि १२.०८, १२.१३, १२.१६, १२.२८, १२.३१ आणि १२.३८ तसेच १२.४३, १.०० आणि २७ जानेवारीची पहाटेची ६.४८ ची लोकल रद्द करण्यात आली आहे.
  • बोरिवली स्थानकातून चर्चगेटला जाणाऱ्या रात्री ११.१५ वाजताची, रात्री ११.२२, रात्री ११.२५, रात्री ११.३५, ११.५२, मध्यरात्री १२.०५ आणि १२.१८ ची लोकल गाडी रद्द करण्यात आली आहे.