राज्यात आतापर्यंत १५ लाख ३ हजार ५० बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. शुक्रवारी ६ हजार १९० नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ८ हजार २४१ रुग्णांनी या आजारावर मात केली असून १२७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत १६ लाख ७२ हजार ८५८ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे तर ४३ हजार ८३७ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी एक हजारपेक्षा जास्त नवीन करोनाबाधित रुग्णाची वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत १,१४५ जणांना करोनाची बाधा झाली असून ३२ रुग्णांचा मृत्यू झाला. आता मुंबईतील रुग्ण संख्या २,५६,५०७ वर पोहचली आहे. तर करोनाबळींची संख्या दहा हजार २१८ इतकी झाली. लागोपाठ तीन दिवस करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात करोनाचा प्रसार आणखी वाढण्याची शक्यात आहे. त्यामुळे आधिकच सतर्क राहण्याची गरज आहे.

मुंबईमधील करोनाबाधित रुग्ण दुपटीच्या कालावधीत अवघ्या १० दिवसांमध्ये ५७ दिवसांनी वाढ झाली असून आजघडीला रुग्ण दुप्पटीचा काळ सरासरी १०० दिवसांवरून १५७ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीच्या कालावधीने २० ऑक्टोबर रोजी १०० दिवसांचा टप्पा ओलांडला होता. गेल्या १० दिवसांमध्ये मुंबईमधील करोना रुग्ण वाढीचा सरासरी दर ०.२५ टक्क्यांनी घसरला आहे. रुग्ण वाढीचा सरासरी दर ०.६० टक्के होता. तो ०.४४ टक्क्यांवर स्थिरावला आहे.

पुढच्यास ठेच मागचा सावध
युरोप, अमेरिकेत आलेली दुसरी लाट ही पुढच्यास ठेच मागचा सावध याप्रमाणे आपल्याला सतर्कतेचा इशारा देणारी आहे. अशी लाट आपल्याकडे येईलच याबाबत ठोसपणे सांगता येणार नाही. रुग्णसंख्या वाढीचा धोका लक्षात घेऊन त्यानुसार पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

हिवाळ्यात संसर्गाचा धोका अधिक
रुग्णसंख्या कमी झाल्याने करोनाची पहिली लाट संपण्याच्या टप्प्यात आहे. मात्र हिवाळ्यात या विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता अधिक आहे. अमेरिका, फ्रान्स, नेदरलँड या देशांमध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेत थंडी हा देखील महत्त्वाचा घटक आहे. आपल्या देशात थंडी त्या तुलनेत कमी असली तरी तापमान साधारण १० अंश सेल्सिअस खाली येते, त्या भागांमध्ये मात्र विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यासह तापमानात घट होणाऱ्या भागात संसर्गाचा धोका हिवाळ्यात वाढणार असल्याचे करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.