मुंबई विद्यापीठ उत्तरपत्रिका घोटाळा
मित्राला मदत करणे मनोज शिंगाडे याला महागात पडले आहे. शिंगाडे याच्या मित्राची अभियांत्रिकी शाखेची दुसऱ्या वर्षांची गणिताची परीक्षा होती. हा पेपर अवघड जाण्याच्या शंकेने शिंगाडेमार्फत त्याच्या मित्राने या पेपर चोरणाऱ्या टोळीशी संपर्क साधला. मात्र शिंगाडे पोलीसांच्या हाती लागल्याने हे प्रकरण उघडकीस आले. पोलीस सध्या शिंगाडेच्या त्या मित्राचा शोध घेत असून याप्रकरणी हस्तगत करण्यात आलेल्या ९२ उत्तरपत्रिका कोणत्या विद्यार्थ्यांच्या आहेत, याचा आम्ही शोध घेत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर भोसले यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

पेपर हार्ड है तो टेन्शन मत लो..
उत्तरपत्रिकांच्या चोरीचा हा घोटाळा गेल्या दोन वर्षांपासून होत असल्याची गंभीर बाब पोलिसी कारवाईनंतर उघड झाली आहे. यात मुख्य आरोपी म्हणून सहभागी असलेल्या विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची मदत हे विद्यार्थीच करत असल्याचे समजले आहे. दलाल म्हणून काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रभाकर वझे मदत करत होता. उत्तरपत्रिका भंडारगृह तसेच महत्वाच्या विभागांच्या चाव्या वझेच्या ताब्यात असत. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांकडे केलेल्या चौकशीत अभियांत्रिकी शाखेच्या उत्तरपत्रिका सोडविण्यासाठी त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम विद्यापीठातील काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ही टोळी मागील दोन वर्षांपासून मुंबई विद्यापीठ कलिना विभागात उत्तरपत्रिका संबंधित विद्यार्थ्यांना घरपोच देण्याचे काम करत होती.
पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर भोसले यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीपाद काळे यांच्या हा प्रकार लक्षात आणून दिला. पोलीस उपआयुक्त संग्रामसिंह निशाणदार यांच्या मार्गदर्शनाखाली भोसले यांनी पथकासह ही कारवाई केली.