22 September 2020

News Flash

आता बोलीभाषांचा स्वतंत्र विषय

आगरी, मालवणी, वाडवळीचा समावेश

मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठात मराठी साहित्याच्या अभ्यासक्रमात आगरी, मालवणी, वाडवळीचा समावेश

मुंबई विद्यापीठाने यंदापासून कलाशाखेच्या पदवीसाठी ‘मराठी साहित्य’ या विषयातील अभ्यासक्रमामध्ये बोलीभाषांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कलाशाखेच्या द्वितीय वर्षांसाठी मराठी साहित्य हा विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून आगरी, मालवणी आणि वाडवळी या तीनपैकी एक बोलीभाषा निवडता येईल. महाविद्यालयांनी या तीन भाषांपैकी एका भाषेचा पर्याय स्वीकारायचा आहे. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी जिल्ह्य़ात मालवणी, आगरी व वाडवळी बोलीभाषा बोलणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. बोलीभाषांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या निर्णयाचे प्राध्यापकांनी स्वागत केले आहे.

दर पाचमैलावर भाषा बदलते असे म्हणतात. बोलीभाषा ही त्या त्या गावाची, समाजाची एक वेगळी ओळख असते. बोलीभाषा टिकविण्यासाठी त्यांचा अभ्यासक्रमात समावेश केला पाहिजे, अशी मागणी अनेक संस्था विद्यापीठाकडे करीत होत्या.

त्यानुसार विद्यापीठाच्या शैक्षणिक अभ्यासक्रम समितीने यंदाच्या वर्षीपासून अभ्यासक्रमात आगरी, मालवणी आणि वाडवळी या तीन बोलीभाषांचा पदवी परीक्षेसाठी समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तळकोकणात मालवणी, ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ात आगरी, तर पालघर जिल्ह्य़ातील वसई परिसरात वाडवळी भाषा बोलली जाते.

यंदापासून कला शाखेतील द्वितीय वर्षांत मराठी साहित्याची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्रात आगरी, मालवणी व वाडवळी या बोलीभाषांपैकी एक निवडता येईल. आगरी भाषेच्या अभ्यासक्रमामध्ये भाषासौंदर्य, तिची लकब, इतिहास, काही विशिष्ट शब्दांवरील पकड, व्याकरण, म्हणी आदींचा समावेश असेल. मालवणी भाषेच्या अभ्यासक्रमात ‘चाकरमानी’ हे नाटक अभ्यासक्रमामध्ये आहे. तसेच भाषेचे सौंदर्य, कथा यांचा समावेश असेल. वाडवळी भाषेच्या अभ्यासक्रमामध्येही नाटक, कादंबरी आणि लोकसाहित्याचा समावेश आहे. बोलीभाषांच्या परीक्षेसाठी शंभर गुणांचा स्वतंत्र पेपर असेल आणि त्यासाठी आवश्यक असलेली पुस्तके ग्रंथालयांमध्ये उपलब्ध असतील.

यापूर्वीही मराठी साहित्यातील द्वितीय वर्षांतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात बोलीभाषांचा समावेश होता. त्यात अहिराणी, वऱ्हाडी, झाडी आदी बोलीभाषा होत्या, मात्र या बोलीभाषांचा अभ्यास तेव्हा केवळ एखाद्या धडय़ापुरता मर्यादित होता. यंदापासून  संपूर्ण शंभर गुणांसाठी बोलीभाषांचा विषय ठेवण्यात आला आहे.

ठाणे, रायगड या भागात आगरी भाषक जास्त आहेत. स्थानिक भूमिपुत्र आगरी असल्याने आम्ही आगरी भाषेचा पर्याय निवडला आहे. या विषयाच्या अभ्यासासाठी पूरक म्हणून सुचविलेली पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध आहेत. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे बोलीभाषांचे संवर्धन होण्यास मदतच होईल.  –मंगला आवटे, प्राध्यापिका (मराठी साहित्य), प्रगती महाविद्यालय, डोंबिवली

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2017 2:20 am

Web Title: mumbai university malvani language agri language
Next Stories
1 सुट्टी असूनही राष्ट्रवादीचे निवेदन स्वीकारण्यासाठी सचिव मंत्रालयात!
2 साहाय्यक आयुक्तांच्या नियुक्त्या वादात
3 सिद्धिविनायकाच्या भाविकांना ‘मेट्रो’चा आसरा
Just Now!
X