News Flash

मुंबई विद्यापीठाचे निकाल पुन्हा रखडले

विद्यापीठांचे निकाल नेहमीच लांबतात. परंतु, यंदा विद्यापीठाच्या परीक्षाही लांबल्या.

शिकविण्याऐवजी प्राध्यापक मूल्यांकनात व्यग्र; विद्यार्थी संभ्रमात

तृतीय वर्ष कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या पाचव्या सत्राच्या आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या शेवटच्या वर्षांच्या परीक्षांचे निकाल ४५ दिवस उलटून गेले तरी जाहीर करण्यात मुंबई विद्यापीठाला यश आलेले नाही. यंदा परीक्षा लांबल्याने दिवाळीच्या सुट्टीत उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे यंदा वर्गावर शिकविण्याबरोबरच प्राध्यापकांना मूल्यांकनालाही वेळ द्यावा लागत आहे. मूल्यांकनाचे काम यामुळे रडतखडत सुरू असून जानेवारी उजाडला तरी निकाल दृष्टिपथात नाही. पाचव्या सत्राच्या निकालाअभावी विद्यार्थी मात्र चांगलेच संभ्रमात आहेत.

विद्यापीठांचे निकाल नेहमीच लांबतात. परंतु, यंदा विद्यापीठाच्या परीक्षाही लांबल्या. एरवी दिवाळीपूर्वी पाचव्या सत्राची परीक्षा आटोपते. त्यामुळे, दिवाळीच्या सुट्टीत उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण होऊन सहावे सत्र सुरू झाल्यानंतर विद्यापीठाला लगेचच निकाल जाहीर करता येतो. परंतु, यंदा मुळात ही परीक्षाच दिवाळीनंतर सुरू झाली. यापैकी तृतीय वर्ष कला शाखेची (टीवायबीए) परीक्षा ३ ऑक्टोबर, २०१६ला सुरू होऊन, १० नोव्हेंबरला संपली. तर तृतीय वर्ष वाणिज्य शाखेची (टीवायबीकॉम) परीक्षा २७ ऑक्टोबरला सुरू होऊन २२ नोव्हेंबरला संपली. तसेच तृतीय वर्ष विज्ञान शाखेची (टीवायबीएस्सी) परीक्षा १८ ऑक्टोबरला सुरू होऊन २७ ऑक्टोबरला संपली. दिवाळीत उत्तरपत्रिका तपासणीचे काम तुलनेत सहजगत्या करता येते. कारण, या काळात प्राध्यापकांना विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम नसते. परंतु, यंदा परीक्षा ऐन दिवाळीत आणि नंतरही सुरूच होत्या. त्यामुळे दुसरे सत्र आणि उत्तरपत्रिका तपासण्याचे काम एकाच वेळी सुरू झाले. वर्गावर शिकवायचे की विद्यापीठाच्या केंद्रांवर जाऊन पेपर तपासायचे, असा प्रश्न होता. परिणामी उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामाला विलंब होत आहे, अशी अडचण एका प्राध्यापकांनी बोलून दाखविली. विद्यापीठाने यंदा उत्तरपत्रिका तपासण्यासाठीची केंद्रे वाढवून ९० केली होती. परंतु, केंद्र वाढवूनही उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला वेग आलेला नाही, हे विशेष. यंदा तर निकाल फेब्रुवारीपर्यंत लांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

‘टीवायबीए आणि टीवायबीएस्सीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे या दोन अभ्यासक्रमांचा (७५-२५चा) निकाल येत्या आठवडाभरात जाहीर होईल,’ असा अंदाज मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे नियंत्रक दीपक वसावे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना वर्तवला. मात्र, विद्यापीठाचा सर्वाधिक मोठा निकाल समजल्या जाणाऱ्या टीवायबीकॉमचा निकाल अद्याप दृष्टिपथात नाही, हेही त्यांनी मान्य केले. दर वर्षी साधारणपणे ८० हजार विद्यार्थी ही परीक्षा देतात. तर टीवायबीएला २५ ते ३० हजार विद्यार्थी आणि टीबायबीएस्सीला साधारणपणे १५ हजार विद्यार्थी बसतात.

नियमानुसार..

ल्ल महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील कलम ७२ नुसार परीक्षा संपल्यानंतर निकाल कमीत कमी ३० आणि जास्तीत जास्त ४५ दिवसांत जाहीर होणे बंधनकारक आहे.

ल्ल परंतु, ४५ दिवस होत आले तरी उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरूच असल्याने परीक्षांचे निकाल विद्यार्थ्यांच्या दृष्टिपथात नाही. टीवायबीएस्सीची तर परीक्षा संपून ७४ दिवस झाले निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आलेले नाही.

एकछत्री अंमल असतानाही

प्राध्यापक, प्राचार्य, पदवीधरांचे राजकीय गट, कर्मचारी, विद्यार्थी आदींचा ‘अधिसभा’ मार्गाने असलेला वचक नसल्यामुळे गेली दोन वर्षे एकछत्री अंमल चालवूनही विद्यापीठाच्या रखडणाऱ्या निकालाच्या तारखा ताळ्यावर आणण्यात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांना यश आलेले नाही. यंदा तर निकालासोबत परीक्षांच्या तारखाही लांबल्या. दिवाळीपूर्वी सुरू होणाऱ्या परीक्षा दिवाळीनंतरही सुरूच होत्या. नेमके हेच कारण निकाल लांबण्यास कारणीभूत ठरले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 3:12 am

Web Title: mumbai university result issue
Next Stories
1 अपघातांत वाढ, पण अपघाती मृत्यूंत घट
2 नोटाबंदीच्या निर्णयानंतर ६१ दिवसांनी काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर
3 ‘एलबीटी’विरोधात व्यापाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव
Just Now!
X